कळमेश्वर पोलिसांची दारूभट्टीवर धाड
एकूण १२ लाख ४५ हजार सहाशे रुपयांचा माल जप्त
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील निमजी खदान येथील पारधी बरड येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून तिची मोठया प्रमाणावर आजूबाजूच्या परिसरात विक्री होत असल्याची गुप्त माहिती कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल मानकीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अशोक सरंबळकर व कळमेश्वर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसीफ राजा शेख यांच्या नेतृत्वाखाली १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिस स्टेशन हद्दीतील निमजी बरड येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारू भट्टीवर छापे मारून एकूण १२ लाख ४५ हजार सहाशे रुपयांचा माल जप्त करून दहा आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाईदरम्यान एकूण ५८00 लिटर सडवा, ११५ लिटर गावठी तयार दारू जप्त करण्यात आली असून, दारू भट्टीसाठी लागणारे ड्रम, घमेले व इतर साहित्य जप्त करून गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. सदर कारवाईसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंडे, खडसे मेश्राम, सहायक फौजदार दिलीप सपाटे, मन्नान नौरंगाबादे, गणेश मुधमाळी व पोलिस कॉन्स्टेबल उईके व इतर कर्मचारी सहभागी होते. गेल्या दहा दिवसांपासून पोलिस स्टेशन कळमेश्वरमार्फत वेळोवेळी कळमेश्वर शहर, गोंडखैरी व कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्री करणा-यांवर छापे टाकण्यात आले व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण १५ लाख ३५ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व तसेच अवैधरित्या जुगार अड्डयावर व सट्टापट्टी चालविणा-याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर कार्रवाई करण्यात आली असल्याचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी सांगितले.

