अमर रहे अमर रहे, शहीद मंगेश रामटेके अमर रहे…च्या जयघोषाने दुमदुमली भिवापूर नगरी – शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7347*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

238

अमर रहे अमर रहे, शहीद मंगेश रामटेके अमर रहे…च्या जयघोषाने दुमदुमली भिवापूर नगरी

– शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : नक्षली हल्ल्यात शहीद झालेले इंडो तिबेट बॉर्डर पोलिस दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल मंगेश रामटेके यांना शनिवारी (६ मार्च) भिवापूर येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसागर उसळला होता.
शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मंगेश रामटेके यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी सिद्धार्थनगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यासह रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे आदींनी याठिकाणी त्यांना र्शद्धांजली वाहिली. छत्तीसगडमधील नारायणपूरपासून काही अंतरावर असलेल्या कोहकामेटा येथे नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट होऊन त्यात मंगेश रामटेके यांना वीरमरण आले. सदर घटना शुक्रवारी (५ मार्च) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. ही वार्ता शहरात पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले. या दु:खद घटनेचा निषेध म्हणून शनिवारी संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अंत्ययात्रा शहीद मंगेश यांच्या निवासस्थानावरून निघून सिद्धार्थनगर, कलार ओळ चौक, रामधन चौक, धनगरपुरामार्गे मरू नदीच्या तिरावर असलेल्या घाटावर नेण्यात आली. शहीद मंगेश रामटेके अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जयच्या गजरात अंत्ययात्रा मार्गक्रमण करीत होती. आमदार राजू पारवे, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, उमरेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
आयटीबीपी दलाने दिली सलामी : अंत्ययात्रेला उपस्थित आयटीबीपीच्या जवानांनी हवेत बार उडवून शहीद मंगेश यांना सलामी दिली. आयटीबीपी दलाचे सहायक सेनानी दिनेश सिंह व उपसेनानी आशिष पांडे यांनी शहीद मंगेशच्या कुटुंबाचे सांत्वन केले. पित्याचे छत्र हिरावलेल्या सात वर्षीय मुलगा तक्ष याला जवळ घेत त्याची प्रेमाने विचारपूस केली.