Home दिन विषेश जागतिक महिला दिन विशेष…..मिशन-स्त्री सुरक्षा

जागतिक महिला दिन विशेष…..मिशन-स्त्री सुरक्षा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7333*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

146 views
0

जागतिक महिला दिन विशेष

मिशन-स्त्री सुरक्षा

खूप झाल कुढणं आता लढायला शिक… जे जे मागे राहून गेलं … ते आता वेचायला शिक… सा-याचं जगण सांभाळत राहिलीस… स्वत:कडे पाहिलचं नाहीस… काळ हातून निसटत चाललाय… आता तरी मनाप्रमाणे जगायला शिक… असा सारा विचार या महिला दिनाच्या वातावरणात स्त्री बाबत निनादत राहणार आहे. तो तुज्यात ऊर्मी भरणार आहे. ही ऊर्मीच आता तुज्या जगण्याच बळ होणार आहे… खूप अश्रू ढाळलेत आजवर.. का तर ‘त्यांनी’ तुला भाग पाडलं रडायला… म्हणून.. आणि म्हणूनच तुज्या अश्रूंची किंमतही त्यांना कधी कधी कळलीच नाही. गेले ते दिवस आता.. आता अश्रूंना अजिबात येऊ द्यायच नाही. पापणीच्या नावेत त्यांच काही कामच नाही…
आता तुज्या डोळ्यात पाणी येवू नये, याकडे लक्ष ठेवतात आहे, तू वादळात जपलेले तुझे दिवे.. तुझी गुणी मुले.. म्हणून त्या अश्रूंबाबत आता तुला कळलचं पाहिजे.
ज्यांच्यासाठी
गाळली
त्यांना जाणीवचं नव्हती
ज्यांना जाणीव होती
त्यांनी ढाळूचं दिली नव्हती…
थोड्या फार फरकाने कित्येकींच्या आयुष्याच्या वाटेवर आलेल्या संघर्षमय वळणांनी तिला असेच अनुभव दिल्याचे लक्षात येते. त्याच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून जेव्हा ती बाईपणाकडे वळली. गुलाबी स्वप्ने मनावर आरुढ होती. त्यानुसारच सारं जीवन असतं.. सुरेख, सुंदर, स्नेहमय आणि आनंदाचे तुषार उडविणार, असं तिला वाटत असत… पण अनेकींच्या वाट्याला जेव्हा स्वप्नांपेक्षा वेगळच वास्तव पुढ्यात येत,तेव्हा ती अवाक होते. अनेकदा अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, नको नको ती नाती सांभाळावी लागतात आणि केवळ त्यावेळी नाही म्हणता आले नाही म्हणून नको-नको त्या विवंचना मागे लागतात. कारण आता जे कार्य स्वीकारलेले असते ते पूर्णत्वास नेणे भाग असते..!
चूल आणि मूल या कक्षांना मोडीत काढत आज स्त्रिया मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या, या बाहेर पडलेल्या स्त्रीने रिक्षा पासून अंतरिक्षा पर्यंत एकही क्षेत्र आपल्या परिस स्पर्शाने उणे ठेवलेले नाही तर तिला जेव्हा जेव्हा.. जिथे जिथे म्हणून संधी मिळाली तिथे तिथे आपल्या गुणांनी सिद्ध झाली, परंतु तिच्या कार्यक्षेत्रात, तिच्या पुढे नवीन आव्हाने उभी ठाकलेली आहेत ही विषयाची दुसरी बाजू नाकारता येत नाही. ग्रामीण भागात शेतात काम करणा-या स्त्रीपासून नासा मध्ये काम करणा-या स्त्रीच्या कार्यात डोकावून वेध घेण्याचा प्रयास केला असता असे लक्षात येते की कामाच्या ठिकाणी विविध आव्हानांना पेलतच तिला पुढं जावे लागतं आहे. प्रत्येकीचे कार्य, कार्यक्षेत्र आणि सारे संदर्भ वेगवेगळे असले तरी प्रत्येक पातळीवर तिचे स्त्री असणे, तिच्या स्त्रीत्वाच्या मर्यादा, तिची सहनशीलता, तिच्या कार्यनिष्ठा, तिचा शांत स्वभाव आणि तिचे तडजोडीचे धोरण यातं साम्य असल्याचे दिसून येते त्यामुळे तिच्या विभागाकडून, अधिका-यांमार्फत एखादी नवी जबाबदारी सोपविली जाते किंवा लादली जाते, त्यावेळी ती एकाएकी नकार देत नाही, तिच्यात नाही म्हणण्याचे धैर्यच नसते किंवा नाही म्हटले तर त्याचे पुढे किती गंभीर परिणाम होतील, याची तिला कल्पना असते. त्यामुळे चक्रव्यूहात शिरल्याप्रमाणे ती गुंतत जाते, ज्यातून परतीची सुटकाच नसते.
कितीतरी दिवसांनी परवा अनिता भेटली. नेहमी हसत, खेळत राहणा-या, प्रसन्न चेह-याच्या अनिताला अशा खिन्न अवस्थेत पाहून जरा आश्चर्यच वाटले. त्यावेळी जे कळले ते अक्षरश: चीड आणणारे होते. आपल्या कामात अतिशय हुशार असलेल्या अनिताला तिच्या कंपनीने एका प्रोजेक्ट मधील जबाबदारी दिली खरं तर हे काम तिच्या नोकरीच्या कामाशी संबंधित नव्हते. परंतु अधिका-यांना ‘नाही’ म्हणता आले नाही म्हणून तिने मागे लावून घेतले होते. पुढे त्यात वेगळ्याच लोकांनी वेगळ्याच भानगडी केल्या, पण जबाबदार अनितालाचं ठरविल्या गेले. आतापर्यंत स्वत:ला त्रास होत असताना सुद्धा प्रामाणिकपणे बिनतक्रार जे अतिरिक्त काम केले होते, त्या कामात मन:स्ताप आणि बदनामी व्यतिरिक्त काही मिळाले नाही. म्हणून आज अनिता अतिशय अस्वस्थ होती. अनिता सारख्या कित्येक जणींना कार्यक्षेत्रात विभिन्न प्रश्नांना तोंड द्यावे लागते. कधी कधी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सुद्धा होतो, ज्यामध्ये लैंगिक प्रकारचे बोलणे, वेशभूषेवरून द्वैअर्थी वाक्ये बोलणे, अश्लील गाणे म्हणणे, लैंगिक साहित्य दाखविणे, अश्लील मॅसेज पाठविणे अशा विविध प्रकारांचा समावेश असतो. तिचे नाही म्हणणे जणू त्यांना त्यांचा अपमान वाटत असतो. अनेकदा अशा मानसिक छळाच्या प्रश्नांची उत्तरे ती स्वत:च्या पातळीवरच शोधत राहते, उत्तर मिळत नाही. म्हणून हवालदिल होते. अशावेळी अनेकदा ग्रामीण भागात शेती, गिरणी, इमारत बांधकाम किंवा मजूरीच्या पातळीवर काम करणारी मजुर स्त्रीअधिक काटक वाटते. जी खमकेपणाने उभी राहत समोरच्याला ठणकावून बजावतेही आणि स्पष्टपणे ‘नाही’ म्हणतेही हे महत्वाचे वाटते. शिकलेली स्त्री जी शासकीय, निमशासकीय महामंडळ, शाळा, कॉलेज,व्यापार,उद्योग, रुग्णालय, खेळ इ. क्षेत्रात कार्यरत आहे. ती बरच सोसत जगते. कार्यक्षेत्रातील प्रश्न आणि घरचे नात्यांचे प्रश्न या दोन पाटातच भरडली जाते. तिला सांगावस वाटत की. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, आपल्या छळाबाबत इतरांशी बोला,त्या त्या वेळी बोला, त्याची लेखी नोंद ठेवा, गाफील राहू नका, साक्षीदार निर्माण करा, संघटनेकडे तक्रार नोंदवा, वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट ठेवा. तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध कुणीही काम करायला भाग पाडू शकत नाही. अतिशय महत्त्वाचे कायदे आज तुमच्या पाठीशी उभे आहेत. त्याचाही आधार घेवू शकता. कोणी कामचुकार म्हटलं तरी चालेल पण ‘नाही’ म्हणता आलं पाहिजे. तरच ती आज या स्पर्धेच्या युगात टिकू शकणार आहे.
“सस्ते मी लूट लेती है ..दुनिया अक्सर जिन्हे अपने एहसास का अंदाज नही होता…”
पण …..सरळमार्गाने जगणा-या सोशिक, नम्र व्यक्तींना हे जमत नाही. इच्छा नसतांनाही हो म्हणून नसत ग्रहण ओढवून घेतात. केवळ एक ‘हो’ म्हणण्याच्या एका चुकीमुळे आयुष्यातले किती तरी निर्णय चुकले, हे कळतं…तेव्हा बराच उशीर झालेला असतो. आतापर्यंत चालत आलेल्या वाटेवरून मागे वळून पाहताना, ते जीवघेण वळण एखाद्या ठसठसणा-या जखमेप्रमाणे छळत राहत. आनंदाच्या क्षणांचा निर्भेळ आनंदही घेवू देत नाही. म्हणून वेळीच ‘नाही’ म्हणता आले पाहिजे. ज्यामुळे पुढची वाट सोपी होईल….
कारण तुझी सुरक्षा तुलाच करायची आहे .या सुरक्षेच्या पाऊल वाटा तुलाच स्पष्ट करायच्या आहेत.. याकरिता तुझी कणखरता तुलाच बांधत न्यायची आहे… यामध्ये तुला कुणीही मदत करणार नाही..तेव्हा तूच हो तुज्या महामागार्ची शिल्पकार…..आणि निर्माण कर तुझे..या जागतिक महिला दिनाच्या
निमित्ताने तुझे..
मिशन- स्त्री सुरक्षा…
– प्रा. विजया मारोतकर, नागपूर (9823706590)