Home Breaking News मराठी भाषा गौरवदिना निमित्त काव्य महोत्सवाचे आयोजन

मराठी भाषा गौरवदिना निमित्त काव्य महोत्सवाचे आयोजन

282 views
0
विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टल प्रतिनिधी,
“मागील दोन वर्षापासून मराठीच्या या क्षेत्रांमध्ये अतिशय सातत्याने कार्य करणाऱ्या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपुर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत मराठी साहित्य क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य केलेले आहे. आम्हाला त्यांचा रास्त अभिमान वाटतो .आज आयोजित करण्यात आलेला “काव्य महोत्सव “हा मराठीच्या सन्मानाचाच एक भाग आहे .”असे उदगार काव्य महोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी मा. उल्हास मनोहर यांनी काढले.
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि डॉ.एम.के.उमाठे महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दि २७ फेब्रुवारी ला आयोजित ‘ऑनलाईन’ काव्य महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सव प्रसंगी मंचावर विशेष अतिथी मा. मंदाताई उमाठे, अध्यक्ष सतीमाता शिक्षण संस्था,प्रमुख अतिथी- सुप्रसिद्ध कवयित्री पुणे  येथून मा.रेणुका कुलकर्णी, डॉ. उमाठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही .नाईक, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रिती उमाठे ,डॉ. प्रमोद लेंडे, माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा.विजया मारोतकर ,उपाध्यक्ष विशाल देवतळे ,
कार्याध्यक्ष – मंगेश बावसे,सहसचिव- चारुदत्त अघोर आणि दोन्ही संस्थेच्या वतीने अनेक मान्यवर उपस्थीत होते.
दीपप्रज्वलना नंतर शीला बीडकर यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत सादर केले.आभासी माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा.विजया मारोतकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेत ‘दोन वर्षांपूर्वी  स्थापन आमच्या संस्थेचा आज संपन्न होत असलेला हा एकविसावा कार्यक्रम असल्याचे सांगितले.’ डॉ.एम.के.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डि.व्ही.नाईक यांनी आपल्या मनोगतात ‘मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान चे कौतुक करुन आपले महाविद्यालय माय मराठीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असेल असे आश्वासन दिले.
विशेष अतिथी मा. मंदाताई उमाठे, अध्यक्ष सतीमाता शिक्षण संस्था यांनी मराठी भाषेचा गौरव विषद करत आयोजना बाबत समाधान व्यक्त केले,तसेच कविवर्य सुरेश भटांची ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ कविता  सुरेख रित्या सादर केली.
‘महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक डॉ प्रमोद लेंडे यांनी अतिशय मोलाचा संदेश मराठी वाचकांना व अभ्यासकांना दिला. आपल्या मनोगताच्या अंती, ‘एक असते भयाण रात्र दु:खाने व्यापलेली…..’ ‘ झुंज ‘
हि भावूक करणारी कविता सादर केली.महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ प्रिती उमाठे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.  संस्थेचे उपाध्यक्ष मा.विशाल देवतळे यांनी माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानची भूमिका स्पष्ट करत कुसुमाग्रजांचा मराठी साहित्यातील गौरव विषद केला.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना आदरांजली म्हणून त्यांच्या कवितांचे अभिवाचन यावेळी करण्यात आले.
डॉ.लिना निकम यांनी “माझ्या मराठी मातीचा”, श्री गोविंद सालपे यांनी,”कणा”, निता खोत यांनी,”गाभारा”,
राहुल तेलंग यांनी,”प्रेम”,तर सुहास काकडे यांनी,”सागर” या कुसुमाग्रजांच्या कविता उत्तमरीत्या सादर करत वातावरण निर्मिती केली आणि नंतर कविसंमेलनाला रीतसर सुरुवात झाली .या दुसर्या सत्रात म्हणजे कविसंमेलनात एकूण ३३ कवी-कवयित्रींनी आपल्या खुमासदार शैलीत कविता सादर केल्यात.
“अरुणोदयाचे करुनी स्वागत, दवबिंदू ते किती चमकती नाजूक नाजूक प्राक्तन सडा,सुरेख रांगोळी सजती…..”
मंजुषा किंजवडेकर यांच्या ‘पहाट’या काव्याने काव्य संमेलनाची सुरुवात झाली.कन्या म्हणून जगू द्या, मी श्रमिक, जीवन संध्या, कर्फ्यु, किती गोड हसतेस हसतेस ग तु..,शब्दगंध, नदी, राष्ट्रगाथा, ऋतुराज, तहान प्रगतीची…… अशा अनेक निसर्ग व सामाजिक विषयांवर सहभागी कवींनी कविता सादर केल्यात.मायमराठी,मराठीची गोडी,मराठीचे कौतुक, मायबोली मराठी…. अशा १७  मायमराठी कवितांनी हजेरी लावून ‘  मराठी भाषा गौरव ‘हा विषय कविसंमेलनाचा केंद्रबिंदू ठरला.मा.दत्ताराम पवार यांनी आपल्या मुलीसह,आई माझी मायेचा सागर… हे गीत गावून सर्वांना अवाक् केले.मा.विजया मारोतकर यांनी मराठी भाषेच्या संवर्धनार्थ “अज्ञानाच्या ‘अ ‘ पासून ज्ञानाच्या ‘ज्ञ ‘पर्यंत,जगणे सारे गेलीस सांगून ,अंधार दूर सारण्या मराठी.. बाराखडी तून आलीस सजून…”
अशी अप्रतिम कविता सादर करून काव्य महोत्सवात मानाचा शिरपेच रोवला.
मा.विशाल देवतळे यांची ‘सजग ठेवू सारे,माय मराठीचे हसू…’हि रचना अविस्मरणीय ठरली.
मंदा खंडारे यांची’एक शेवटची इच्छा’ ही कविता विशेष पसंतीस उतरली.
या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ उल्हास मनोहर, विशेष अतिथी मंदाताई उमाठे, प्रमुख अतिथी रेणूकाताई कुळकर्णी यांनी देखील आपल्या मनोगतासह ‘नाते’ कविता सादर करून रसिकांची मने जिंकलीत.एकंदरच काव्यमहोत्सवात एकसे बढकर एक कविता सादर करून सहभागी कविंनी ऑनलाईन समारंभातही सगळ्यांना बांधुन ठेवले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे संचालन राजश्री कुळकर्णी यांनी तर द्वितीय सत्राचे संचालन कोकीळा खोदनकर यांनी केले.श्री.मंगेश बावसे, डॉ.माधव शोभणे, नीता अल्लेवार यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.खेडकर यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सहसचिव चारुदत्त अघोर यांनी आयोजकांचे, मान्यवरांचे तसेच सहभागी कवी कवयित्रींचेआभार मानले.