Home आंतरराष्ट्रीय 27 फेबु. जागतिक मराठी भाषा दिवस विशेष… मायमराठी कौतुकाची

27 फेबु. जागतिक मराठी भाषा दिवस विशेष… मायमराठी कौतुकाची

0
27 फेबु. जागतिक मराठी भाषा दिवस विशेष… मायमराठी कौतुकाची

27 फेबु. जागतिक मराठी भाषा दिवस विशेष…
मायमराठी कौतुकाची

माझा मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन

अशा या रसाळ आणि अमृताहुनी गोड मराठीला ज्ञानदेवांनी बहरवली. संस्कृत भाषेतील भगवद्गगीता निरक्षर,गरीब सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. तिला मराठीचे स्वरूप देऊन ज्ञानेश्वरांनी रसिकांपर्यंत पोहोचवली आपल्या ज्ञानेश्वरीतून. खरंच ! इतकी मधूर मराठी भाषा कोणाला आवडणार नाही? कानडीने केला मराठी भ्रतार. म्हणजे या रसाळ मराठीला म्हणूनच कानडीनेही मराठी नवरा केला. मग आमच्यासारख्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मराठी बाण्याची काय कथा!आपला व्यवहार आपल्या बहूजन समाजातील प्रजेला व्यवस्थित समजावा म्हणून छत्रपती शिवरायांनी आपला राज्यव्यवहारकोषही मराठीतूनच निर्मिला.धन्य ते शिवराय आणि धन्य ती मराठी बोली!
आपल्या महाराष्ट्राला महान संत परंपरा आहे.संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ यांनी समाजोद्धाराचे महान कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या गवळणी, अभंग, कीर्तने आज देखील घराघरात गावागावात गायिली,भजली जातात. समाजातील जाती, परंपरा, रूढी यांचा त्यांनी आपल्या काव्यातून निषेध केला आणि समाजाला उद्बोधक अशी शिकवण दिली.संतांनी पूजिलेले आपले महाराष्ट्र दैवत पंढरपूरचा विठ्ठल आजही वारक-यांना साद घालतो.”विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”आणि “निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम” असा जयघोष करत आषाढी नि कार्तिकी एकादशीला भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारी पंढरीत येते. सर्व वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात बेभान होतात. जणू काय पांडुरंग त्यांचा सखा विठूमाऊलीच! एकादशीला पंढरीत दिंडी घेऊन रिंगण घातले जाते. वारक-यांच्या हृदयात विठ्ठल भेटीची ओढ असलेली दिसून येते. साध्याभोळ्या सर्वधर्मसमभाव असणा-या वारक-यांचा हा विठोबा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन संताना दर्शन घेऊन गेला.
नामाच्या घरात दासी असलेली जनाबाई दळिता कांडिता विठ्ठल भक्तीत दंग व्हायची. त्यावेळी विठ्ठल आपल्या रेशमी शेल्याने तिचा घाम पुसत असे. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा कूप्रवृत्तींनी इंद्रायणीत बुडवल्या होत्या.त्या विठ्ठलाने आपल्या भक्तासाठी परत आणून दिल्या. या संतांनी गरीब दीनदुबळ्या, रंजल्या गांजलेल्यांच्यातच विठ्ठलाला पाहिले, त्यांची सेवा केली. त्यामुळेच विठ्ठलाने सगुण रूपाचे दर्शन देऊन त्यांना तोषविले. स्त्री संत सोयराबाई, मुक्ताबाई, निर्मलाबाई एवढेच नव्हे तर गणिका असणारी कान्होपात्रा विठ्ठल भक्तीत रममाण व्हायच्या आणि समाजाला आपल्या काव्यातून संदेश द्यायच्या.
गाडगे बाबांसारखा निरक्षर माणूस दिवसभर झाडू, खराटा हाती घेऊन रस्त्यावरील कचरा साफ करत असे. रात्री लोकांच्या मनातील पापवृत्ती स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावरील दोन दगडाचे टाळ करून समाजाला भजन, कीर्तनातून संदेश देत असे. शिकवण देत असे. संत गजानन महाराज, संत तुकडोजी महाराज या संतांनी देखील जागोजागी आपल्या विचारांचे, शिकवणुकीचे ज्ञानामृत समाजाला पाजले आहे. सुलतानी आक्रमणाच्या वेळी मराठ्यांची स्थिती दयनीय होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जुलूम जबरदस्तीने मराठी समाज पूर्ण पिचून गेला होता. अशा वेळी जिजामातेसारख्या आदर्श, थोर स्त्रीने शिवबांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली आणि मूठभर मावळ्यांच्या मदतीने शिवरायांनी मराठी मुलखाला नवचैतन्य मिळवून दिले.
गड-किल्ल्यांचे दुरुस्ती करून बुरूज, तट यांच्याद्वारे किल्ल्यांना मजबुती आणली. यामूळे मराठ्यांना सुरक्षित,स्थिर आयुष्य लाभले. शिवाजी महाराजांनी छत्रपती म्हणुन स्वत:चा राज्याभिषेक केला. त्यावेळी मराठी माणसासाठी राज्यकारभार सोपा जावा म्हणून सर्व कारभार मराठीतूनच सुरू केला. मराठी वीरांना युद्धासाठी, लढ्यासाठी चैतन्यपूर्ण व्हावे म्हणून शाहिरांनी आपल्या कवनातून रक्त सळसळणारे पोवाडे लिहिले आणि गाईले. मराठीतील लावणी तरी घरोघरी पोहोचवण्याचे काम शाहिरांनी केले.
पंत कवी मोरोपंत, श्रीधर, मुक्तेश्वर यांनी समाजाला प्रेमाची अनुभूती देताना नल दमयंती अशा प्रेमी युगुलांच्या उदाहरणांनी सुंदर रसाळ प्रेमकाव्य लिहिली, गायिली.स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत कितीतरी कवी आणि लेखकांनी मराठीसाठी आपले योगदान दिले आहे. आपल्या ज्ञानाचे अमृत रसाळ मराठी भाषेतून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. समाजाला घडवण्याचे काम या कवी आणि लेखकांनी करत असतानाच प्रबोधनही केले आहे. गायक, गायिकांनी आपल्या गोड गळ्याने या कवितांचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे माझी मराठी ही सातासमुद्रापार देखील गायिली, ऐकली जाते. मराठीचे अमृतपान करणारा रसिक मंत्रमुग्ध होऊन, भान हरपून गीतं ऐकण्यात दंग होऊन जातो .
सावरकरांपासून ते वि. स. खांडेकरांपर्यंत आणि कुसुमाग्रजांपासून ते विंदा करंदीकर यांच्या अशा अनेक कवींच्या लेखणीतून मराठीला अलंकारिकरित्या सजविले, नटविले आहे.
मराठीच्या या रसाळ अभंग,ओव्या, गवळणी,कवने, पोवाडे, प्रेमकविता ऐकत त्या महासागरात डोलताना भावविभोर भावनांनी आपण इतके डुंबून जातो की आपल्याला वेळ काळाचेही भान राहत नाही.

-सौ. भारती सावंत
मुंबई
9653445835