
विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : व-हाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्था,बाशीर्टाकळी जिल्हा अकोला द्वारा संचालित अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच अकोला यांचेमार्फत व-हाडी भाषेत प्रयोगशील लिखाण व उदयोन्मुख साहित्यिक व व?्हाडी भाषा जोपासण्याकरिता दिला जाणारा मा.पुष्पराज गावंडे ‘यलाई’ पुरस्कार 2021 हा प्रवीण जगन्नाथ बोपुलकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराची घोषणा संपूर्ण निवड समितीच्या मार्फत अखिल भारतीय मंचाचे अध्यक्ष मा. श्याम ठक, सचिव मा. प्रा. महादेव लुले व मार्गदर्शक मा. पुष्पराज गावंडे यांनी केली. हा पुरस्कार येत्या 23 फेबृवारी 2021 रोजी संत नगरी शेगाव इथे होणा-या चौथ्या अखिल भारतीय व-हाडी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रवीण बोपुलकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील खेट्री येथील रहिवासी असून सध्या मुंबईला वस्तू व सेवा कर विभागात नोकरीला आहेत. नोकरी करून टीम शब्दवेल साहित्य समूहाच्या माध्यमातून जवळपास पाच हजार साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. व-हाडी भाषेतील त्यांची ‘कयस’ ही कादंबरी लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपूर्ण अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच परिवार, शब्दवेल साहित्य समूह व जाई फाउंडेशन मुंबई या परिवारातून विशेष कौतूक होतं आहे.

