बळीराजा : सुखी भव

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6660*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

266

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल :

       निसर्ग भासतो गावचा
किती सुंदर नि मोकळा
वाटतेच जावे गावाला
पिकवावा फुलवावा मळा
खरेच! गावाला राहणारा आणि मळ्यात आपले आयुष्य काढणारा  बळीराजा खूपच भाग्यवान रोज प्रात:काळी उठून भाकरी चटणीची न्याहारी करून नांगर खांद्यावर घ्यायचा. हाताला ढवळ्या पवळ्याची जोडी अन्  शेतात काम करायचे,.सुखाचे जीवन!आपल्या मनाला वाटेल तितके खपावे, दुपारी जेवण करून झाडाच्या शांत थंडगार सावलीत बुंध्याची उशी करून लवंडावे नि आराम करून पुन्हा कामाला उभारीने सुरुवात करावी. शहरातल्या सारखे धकाधकीचे जीवन नाही. रोज लोकल आणि ऑफिसचे मस्टर गाठण्यासाठी पळापळ नाही. लोकलमध्ये हात लटकन तासन् तास प्रवास करून शरीर आणि मन दोन्ही थकून जाते. पुन्हा काम करण्यासाठी ऊर्जा वाचत नाही. दमट वातावरणात आणि घाम गळेपर्यंत पळाल्याने मनाला शांती नाही. सकाळी आणलेला चपातीभाजीचा थंडगार डबा खायला लागतो.
गरम गरम भाकरी, बेसन, दही आणि ठेचा घेऊन मळ्यात जेवण घेऊन येते अन् दोघेही संगतीनं चार घास जास्तच जेवतात. पाच मिनिटात वचवच खाऊन पुन्हा कामाशी गाठ घालण्याचा प्रश्नच नाही. गावचे रानवारे मस्त शीतल हवा देते. त्यात डूलकी न लागेल तरच नवल! शिवाय शारीरिक कष्ट केल्याने भूक आणि झोपही चांगली लागते. कामाचा तणाव नाही. उगाच चिंता, काळजी नाही. शेतात कष्ट करावे, संध्याकाळी घरी येऊन चहापान करून जरा मंदिरात देवदर्शन करून यावे. काही भक्तगण भजन-कीर्तनातही रमतात. घरी येऊन चविष्ट जेवण खावे अन उद्याची स्वप्ने पहात स्वस्थ झोपून जावे. सुखाचे अन् निष्काळजी जीवन जगल्याने रोग, विकार नि आजार शरीराला शिवतच नाही. निरोगी शरीर असल्यावर जीवनात आणखी काय हवे!
कधीतरी निसर्गाची अवकृपा झाल्यावर बळीराजाला नुकसान झेलावे लागते. परंतु निसर्गापुढे कोणाचे काय चालणार! गाई,बैल,म्हैशी घरचे दूध, तूप, लोणी खायला मिळण्याची मुबलकता. त्यामुळे शरीरही धष्टपुष्ट होते.
नकोच बँकेत लाखों बॅलन्स
असायला पैशाची खुळखुळ
जगतो आनंदाचे जिणे आम्हीं
जसा काही झराच झुळझुळ
पन्नास शंभर साड्या, कपडे, दहावीस चपलांचे जोड, घरासाठी काढलेले लाखोंचे कर्ज, बँकेच्या लॉकर मधील शंभर तोळे कधीच सुखाची झोप घेवू देणार नाहीत. परंतु अंग झाकण्यापुरते वस्त्र आणि कामापुरता पैसा असेल तर ती व्यक्ती शांत निद्राधीन होते. कोणा चोराचिलटाचे भय नाही अन भरमसाठ कमवलेला पैसा कुठे गुंतवायचा त्याची पर्वा नाही. येईल तो दिवस आपला समजून निवांत खाऊनपिऊन सुखी राहणे हेच बळीराजाच्या जीवनाचे ध्येय असते.
नको फुकाचा पैसाअडका
प्यारी मजला ही चंद्रमौळी
सोने चांदीही वर्ज्य असता
खावी सुखाची भाजीपोळी
अशा जीवन तत्वांनी आपले जीवन सुखात जगणारा आणि आपल्या शेतात दिनरात घाम गाळून सोने पिकवणारा जगाचा हा पोशिंदा आपल्या  पोटाची सुव्यवस्था राखतो आणि आपल्या दोन वेळच्या पोटाची सोय करतो. म्हणूनच आपण सुखाची पोळी खाऊ शकतो. त्याच्या कष्टाची किंमत व्हावी, त्याला, त्याच्या संसाराला सुखाने राहता यावे अशी आपणही व्यवस्था करावी एवढीच माफक अपेक्षा त्याला असते. त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा असे त्याला वाटणे साहजिकच आहे.लाखों करोडोंची मालमत्ता त्याला कधीच नको असते. हवा असतो देशवासियांचा खंबीर हात आणि निसर्गाची अनुकूल साथ! निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकल्यानंतर मदतीसाठी त्याने दिलेली साद आपल्या कानी पडावी अन् संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला मदत करावी. स्वच्छंदी जीवनाला नको लाखोंचा पैसा, पोटापुरता हवा पैसा.
बळीसारखे आयुष्य जगणे म्हणजे खरे तर सुखाचेच. नको रोज पिझ्झा-बर्गर, हवी त्याला ठेचा भाकरी जी त्याला निरोगी बनवते.नकोच बिसलरीचे बाटलीबंद पाणी, शिवारालगत वाहणारा स्फटिकसारखे मधूर जल पुरविणारा झुळझुळ झरा त्याची तहान भागवतो. त्यातूनच सर्व प्रकारची खनिजे आणि विटामिन्स मिळतात.सण सोहळ्याला मात्र बळीराजाही आपल्या सहकारी मित्रांसोबत एकत्र येतो. सर्व मिळून सणांचा आनंद लुटतात. तसेच गावात देव धर्माच्या कार्याला बळी सर्वतोपरी सहाय्य करतो. गावी वर्षातून एकदा भरणारी यात्रा त्याला अपरिमित आनंद देते. त्यात मिळणाऱ्या आनंदाचे संचित त्याला वर्षभर पुरते. आपल्या ढवळ्यापवळ्याला  सजवून तो शर्यती खेळतो. त्यांचा सन्मान करतो.बैलजोडीच्या मेहनतीची जाण ठेऊन वर्षातला एकदाच येणारा बैलपोळा सण जल्लोषात साजरा करतो. बळीराजाची सेवा करणारी त्याची बैलजोडी त्याला आपल्या जवळची वाटते. अशा या इमानी सेवकांना तो पोळ्या दिवशी विशेष जपतो. सकाळीच उठून नदीवरून त्यांना अंघोळ घालून आणतो. त्यांच्या सर्वांगावर गेरूने,रंगाने ठिपके द्यायचे,त्यांच्या शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग,गळ्यात कवड्यांच्या माळा घालायच्या,पायात चांदीचे तोडे घालतात. त्यांची यथासांग पुजा होते. सुवासिनी त्यांना पंचारतीने ओवाळतात. गोड-धोड पुरणपोळीचा घास खाऊ घालतात. त्यांच्या पाठीवर झूल टाकून गावातून मिरवणूक काढतात. त्याचा खराखुरा सखा त्याचा बैल असतो. त्याचे ऋण फेडण्यासाठी पोळ्या दिवशी तो नांगराला जुंपत नाही. वर्षातून एक दिवस त्याला आराम देतो.
बळीसाठी आपला गाव स्वर्गासमान असतो. त्याला गावच्या मातीची ओढ असते. गावाची सेवा करण्यातच तो धन्यता मानतो. पण त्याला जगवणाऱ्या काळ्या आईला तो खूप मानतो. म्हणूनच शेती कसणे त्याचे परम कर्तव्य असते. त्याचे कुटुंब याच काळ्या आईच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळे तिचेही ऋण तो मानत असतो.बळी शहरात कधीच रमु शकत नाही. शहराचे धकाधकीचे आयुष्य त्याच्या अंगवळणी पडू शकत नाहीत. या मातीतील अन्न खाऊन आपली जोपासना झाली, तिच्यात हाडाची काडे केली. शेवटी मेल्यानंतरही या काळ्या मातीतच आपल्या देहाची माती व्हावी अशी त्याची इच्छा असते.शहरात असणारे चंगळवादी जीवन त्याला आकर्षित करत नाही. गावात स्वच्छ, प्रदूषणविरहीत जीवन जगताना त्याला आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. वडिलोपार्जित वाड्यात त्याचा रहिवास म्हणजे स्वर्गच. मळ्यात पिकलेला भाजीपाला त्याला इंद्राच्या नंदनवनाहूनी मौल्यवान वाटतो. कारण त्यात त्याचा घाम गाळलेला असतो. आपल्या कष्टाचे चीज करून देणारी ही काळी आईच असते.ती त्याला प्राणाहूनही प्रिय असते.
नको शहराचा रहिवास
हवा मजला माझा गाव
मस्तमौला जीवन माझे
बळीराजा माझे नाव

सौ. भारती सावंत
मुंबई
9653445835

Attachments area