जि.प. शिक्षण समितीला गणवेश रंग ठरविण्याचा अधिकार कोणी दिला ?

शालेय व्यवस्थापन समितीचा सवाल

255

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, यांच्या परिपत्रकाचे पालन न करता जि. प. शिक्षण समितीने थेट विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करून व्यवसाय सुरू करावा, अशी तिखट प्रतिक्रिया शालेय व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, मुंबई यांच्या परिपत्रकानुसार मोफत विद्यार्थी गणवेश रंग ठरविण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला असतांना दि. २२/०७/२०२० च्या जिल्हा परिषद, नागपुर शिक्षण समितीच्या सभेत सभेचे सचिव शिक्षणाअधिकारी, प्राथमिक नागपूर यांनी सभेला महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, यांच्या परिपत्रकानुसार गणवेश रंग ठरविण्याचा अधिकार जिल्हा परिषद शिक्षण समितीला नाही असे सभेत सूचित करूनही दि. २२/०७/२०२० चा लोकमत वृत्तपत्रात जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचे गणवेश (मरून पॅन्ट, पांढरा गुलाबी शर्ट) या गणवेश रंगावर निश्चित करून शिक्षण समितीने शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले.
परंतु शिक्षण समितीच्या दि. २२/०७/२०२० च्या इतिवृत्तांत विषय क्र. ६ नुसार घेतलेल्या निर्णयाबाबत इतिवृत्तांत गणवेषाचा रंग नमूद केलेला नाही. यावरून प्रश्न उपस्थित होतो की, जिल्हा परिषद शिक्षण समिती ला गणवेश रंग ठरविण्याचा अधिकार कोणी दिला व कशासाठी. गणवेश निधीवर डोळा ठेवून पुंजीपती पुरवठा धारक यांच्याकडून लाभ व्हावा, वर्तमानपत्रातील बातमीमुळे पुरवठा धारकांची रीघ वाढावी, हातावरचे पोट भरणारे शिंपी, महिला बचत गट, बेरोजगारांच्या व औद्योगिक सहकारी संस्था, छोटे व्यवसायिक,कापड विक्रेते यांच्यावर कोरोना संकट काळात रोजगाराचा प्रश्न भेडसावत असताना समाजव्यवस्थेचे रोजगारविषयक नुकसान करण्याचा घाट जिल्हा परिषद शिक्षण समितीने चालविला आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या मनात असंतोष असून शोभेच्या शाळा व्यवस्थापन समित्या बरखास्त करा अन्यथा आमचे राजीनामे घ्या अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. त्यामुळे मोफत गणवेश योजनेचे भविष्य अंधारात असेल आणि म्हणूनच मागील सत्र २०१९-२०२० या काळातील गणवेश (निळी लाइनिंग शर्ट, ग्रे कॉलर,ग्रे हाफ पॅन्ट) हा कायम असावा अशी मागणी शाळा व्यवस्थापन स्तरातून पुढे येत आहे. तरी जि.प. शिक्षण समितीने पुंजीपती पुरवठाधारकांचे गणवेश ३ पं.स स्तरावरुन केंद्र प्रमुख मार्फत शाळा स्तरावर दरपत्रके पोहचविण्याचे दबावतंत्र आखले आहे. हे कशा साठी.