अध्यक्षपदा नंतरची वाटचाल

भारतातील पहिले ओबीसी महिला साहित्य संमेलन 2019 च्या अध्यक्ष प्रा.विजया मारोतकर यांची भूमिका

231

दि.25 डिसेंबर 2019 रोजी भारतातील पहिले ओबीसी महिला साहित्य संमेलन झाले होते. या ऐतिहासिक घटनेच्या वर्षपूर्ती निमित्त हा लेख प्रकाशित करीत आहोत.
काही काही क्षण जगणे सुगंधित करून टाकतात. हा सुगंध म्हणजे जणू जगण्याला लाभलेली एक अनामिक अशी तृप्ती असते. खरंतर जगण्याच्या वाटेवर माणसाला नेहमीच काहीतरी हवं असतं… परंतु नेमकं काय हवं…?
हे कळत नाही, परंतु तगमग मात्र संपत नाही. अशा मनोवस्थेतून जात असताना घडणारी एखादी घटना आयुष्याला तृप्त करून टाकत असेल तर खरंच जगणे सार्थकी झाल्या सारखे वाटते. असेच काही क्षण जगण्याने माज्या ओंजळी मध्ये टाकले आणि ओंजळ भरून वाहते आहे,याचा अनुभव रोजच मी घेते आहे.
दि.25 डिसेंबर 2019 ….माज्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा …असा दिवस …ज्या दिवसाने
भारतातील पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला बहाल केलं . या घटनेला एक वर्ष होत आहे. मागे वळून पाहतांना मी या अध्यक्षपदाला न्याय देऊ शकले का …? याबाबतचे आत्मचिंतन केले असता,मला प्राप्त झालेल्या समाधानाचा हा आलेख ….
जो मला आपणापर्यंत पोहोचावावासा वाटला. त्यासोबतच ओबीसी महिलांमधील लेखन प्रतिभेचं कौतुकही करावसं वाटलं. ओबीसी महिला साहित्य संमेलनाची अध्यक्ष या नात्याने नक्कीच मला माझ्या या पदाच्या कर्तव्याची जाणीवही झाली. त्यादृृष्टीने मागील वर्षभरात मला ओबीसी महिलांच्या साहित्य प्रांतात जे काही करता आले त्या बाबत म्हणावेसे वाटते …

लेखनाचा त्यांनीही जोपासावा वसा
ही सदा ठेवली जाण…
सख्यांनी ही या प्रवाहात यावे
यास्तव ठेवले कर्तव्याचे भान..

आणि या कर्तव्य जाणिवांना सतत जागृत ठेवण्याचे कार्य मी वर्षभर करत राहिलेले आहे….. आनंद हा वाटल्याने नेहमी वाढतच जातो.याचा प्रत्यय आयुष्यात जगताना मला नेहमीच येत असतो,नव्हे तर तो माझा स्वभाव झालेला आहे.

माझ्या बाबतीत सांगायचे झाल्यास साहित्य लेखनाच्या वाटेवर मी कधी आले,ते माझे मलाच कळले नाही.
लेखन मी मुळी ठरवून कधी केलेच नाही. लहानपणी घरी श्रीमंती नव्हती,पण आई-वडिलांना वाचनाची आवड असल्यामुळे घरी भरपूर पुस्तके यायची. पुस्तकांचे कपाट हेच घराचे वैभव होते. शालेय जीवनातच ऐतिहासिक चरित्रे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, सईबाई, येसूबाई, तारा बाई, संभाजी राजे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित्रे, राष्ट्रसंतांची ग्रामगीता या वाचनाची आवड निर्माण झाली. नित्यनेमाने वाचनालयाचे उंबरठे झिजवल्याचे आणि भावंडांमधे पुस्तक वाचण्याकरिता वाद झाल्याचे ..चांगले आठवते. कदाचित यातूनच घडत गेले. सहाव्या वर्गात असताना मी माझ्या वर्ग हस्तलिखिताचे संपादक होते. एक कविताही लिहिली होती,पण पुढे निबंध लेखनात नेहमीच बाजी मारत राहिले. माझा निबंध वर्गात हमखास वाचून दाखविला जाई. वाद-विवाद वक्तृत्व स्पधेर्तून बोलत राहिली,जिंकत राहिली.. पण या गोष्टी मला एक लेखिका,कवयित्री बनवतील असे कधीही वाटले नव्हते. शिक्षण, नौकरी. घर संसार यात लेखन राहून गेले..यातून निवांत होत असतांना…मी पुन्हा नव्याने थोडं फार लिहू लागले..
पण खरी सुरुवात झाली एका दु:खद घटनेतून …. माझ्याकडून
‘व्यथा’ ही एक कविता लिहिली गेली.
या वेदनामय काव्याने मला बरेच चांगले अभिप्राय दिले.. त्यामुळे मी लिहीत राहिले. लिहिता लिहिता माझी कविता स्वत:च्या परिघाबाहेर येऊन व्यक्त होऊ लागली . जी कधी अन्यायाचा विस्फोट करणारी, कधी कारुण्याची ओळख करून देणारी, कधी चारित्र्याचे निर्मळ वस्त्र, कधी मायेचा पदर, कधी संयमाचा कळस ,कधी भावनांचा समुद्र गोठवणारी, कधी सामाजिक प्रश्नांचा वेध घेणारी तर कधी माज्या सख्यांच्या पंखांना बळ देताना उभारी देणारी झाली,हे माझे मलाच कळले नाही. पहिला काव्यसंग्रह ‘स्वल्पविराम’ प्रकाशित झाला. ज्याला शब्दप्रभू राम शेवाळकर यांची प्रस्तावना, कवयत्री सुलभाताई हेरलेकर यांचा अभिप्राय लाभलेला आहे. प्रकाशन समारंभ प्रसंगी माननीय सुलभा ताईंनी दिलेला आशीर्वाद
-“विजया, यापुढे तुला कायमच स्वल्पविराम भेटत राहिल… पूर्णविराम कधी कधी मिळणारच नाही ” या शुभेच्छा फळास येऊन माझी मराठी साहित्यात वाटचाल होत राहिलेली असावी,असे वाटते.
स्वल्पविराम नंतर आवर्तन, प्रवाह, आभाळ पेलताना, रंग-तरंग या काव्यसंग्रहाने आणि हिंदोळा ,ग्रीष्म पलाश या चारोळी संग्रहांनी मला कवयित्री म्हणून मान्यता दिली.

‘मी फुलपाखरू होईन म्हणते ‘
ही माझी कविता माझी ओळख झालेली आहे. जी कुठेही गेले तरी, कोणीतरी म्हणायला भाग पाडतंच.. जी माज्या प्रत्येक सखीला तिचीच वाटते ,

तुटत गेली मनातून तरीही
या पंखांना मात्र जपीन म्हणते
शकले कितीही झाली मनाची तरीही ..
अंतर कापिन म्हणते
मी फुलपाखरू होईन म्हणते…

कविते सोबतच माझे कथा लेखनही सुरू होते त्यामुळे आज सार्थक, प्रतीक्षा, संस्कार कलश,अहो, ऐकलं का , पोरी जरा जपून, हे कथासंग्रह प्रकाशित झाले. ज्यांनी मला भरभरून वाचकांचे अभिप्राय आणि कथा पुरस्कार मिळवून दिले. कथालेखनाला प्रवृत्त करत राहणाºया या वातावरणामुळे लॉकडाऊन च्या काळात ही माझा *लॉकडाऊन* हा कथासंग्रह आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते 15 आॅगस्ट 2020 रोजी आॅनलाइन प्रकाशित झाला.
आज मागे वळून पाहतान्ना जाणवते
संस्कारांच भरभरून दान देणारे माता-पिता लाभल्यामुळेच लेखन वाचनाची आवड निर्माण झाली
असावी…कारण
संस्कारांचा देणे जेंव्हा
होते जीवन लेणे
जगणे सुरेख होते
अन सुरेल होते जीवनगाणे

असेच काहीसे माझ्या बाबत घडत गेले. याचाच प्रत्यय म्हणजे माझ्याकडे चालत आलेलं भारतातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होय.

आज मराठी साहित्यात 33 पुस्तकं माझ्या खात्यावर आहेत. ज्यामध्ये काव्य,कथा ,वैचारीक लेख,समीक्षा,चरित्रलेखन, कादंबरी यासारख्या सर्वच प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. ही वाटचाल करताना मी ठरवून काहीच केलेले नव्हते परंतु उगवत्या सूर्याने नित्यच परत जाताना माज्या पदरात लेखनाचं टाकलेल दान मात्र मी भरभरून स्वीकारलं आणि मला लेखनाचा छंद जडला .
तरुण भारत,देशोन्नती, पुण्यनगरी, सकाळ,महाराष्ट्र टाईम्स, लोकशाही वार्ता यांसारख्या वृत्तपत्रांनी माझं लेखन जनमानसापर्यंत पोचवलं. जवळपास या सर्वच वृत्तपत्रांचा माझा एक स्वतंत्र असा वाचक वर्ग निर्माण झाला. त्यांचे सतत मिळणारे प्रोत्साहन आणि अभिप्राय मला या वाटेवर कायम पुढे नेत राहिले, त्यामुळे ही स्वप्नवत वाटचाल सुरूच आहे .
मी तरुण मुलींची शिक्षिका असल्यामुळे माझ्या महाविद्यालयातील त्यांचा माज्या सभोवतालचा वावर मला कायमच सुखावत गेला ..पण अलीकडच्या काळात त्यांच्या आयुष्यात मोबाइल फोनने मांडलेल्या उच्छादा मुळे मी बेचैन होऊ लागले होते.उध्वस्त होणाºया कळ्यांना पाहतांना फार वेदना झाल्या आणि त्या वेदनेतूनच मी ‘पोरी जरा जपून’
या प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रमाच्या वाटेवर कधी निघाले, माझे मलाच कळले नाही. आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत 266 कार्यक्रमा व्दारे मी लाखो मुलीं पर्यंत पोहचले आणि माझी लेखनाची वाटचाल या स्त्री वादी दिशेने ही सुरू झाली.
‘पोरी जरा जपून’ हा कथा संग्रह ,’धुक्यात हरवली वाट’, ही कादंबरी, ‘सदाफुली’ हा लेख संग्रह या महिलांच्या प्रश्ना संबधीच्या लेखनामध्ये याचा प्रत्यय येतो. लेखना सोबतच सामाजिक जाणीवा जपत प्रत्यक्ष त्यांच्या पातळीवर जाऊन काम करणारी लेखिका म्हणूनच ओबीसी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी मला सांगितले,
त्या वेळेला मला नाही म्हणण्याचे काहीच कारण नव्हते .अध्यक्षपद स्वीकारले तरी डिसेंबर मध्ये ही पुणे, लोणावळा ,आळंदी, शिरुर येथील पूर्व नियोजित “पोरी जरा जपून ” कार्यक्रमात व्यस्त होते .साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद माझ्याकडे आले असले तरी आयोजनामध्ये माझ्या सर्व मैत्रिणी असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा पासून मला देता येईल तेवढे सहकार्य दिलेले आहे.
मला माहीत असलेल्या ओबीसी लेखिकांना विविध सत्रात निमंत्रित केले. त्या आपल्या कथा, कविता,अन विचार प्रवाहाच्या विविध स्तरां मधून भरभरून व्यक्त झाल्या. लेखनाबाबत नवा दृष्टीकोन निर्माण करण्यात हे संमेलन यशस्वी ठरले आहे .
साहित्य संमेलन आटोपल्यानंतर ओबिसी महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता माझ्या लक्षात आले की विदर्भाच्या कानाकोपºयात कितीतरी ओबीसी समाजाच्या महिला सुरेख लेखन करतात. त्यांच्या लेखनातून त्यांचं जगणं व्यक्त होतं. रूढी परंपरांचे जोखड झुगारून देणं खरंच सोपं नसतं .नातीगोती ,घर-संसार, वाट्याला आलेले संदर्भ यातून स्वत:ची वाट काढत लेखन करणे ही आजही ओबीसी समाजातील महिलांकरता अतिशय कठीण अशीच गोष्ट आहे .त्यातल्या त्यात दोन चारच कविता ,एक दोनच लेख, एक दोनच कथा अस फुटकळ लेखन करणाºया ओबीसी महिलांची संख्या फार मोठी आहे. मी याचाही वेध घेतला असता जवळपास 798 भगिनींशी मला संपर्क साधता आला. त्यांच्या लेखनाप्रतीच्या प्रगल्भ जाणिवा पाहून मी स्तंभित झाले .केवळ योग्य वेळी ,योग्य मार्गदर्शन, दिशा मिळाली नाही, तिच्या लेखनाचे कौतुक झाले नाही त्यामुळे ती आजवर कोणाला कळली नाही. अशी प्रगल्भ जाणीव असलेली ओबीसी समाजातील लिहिती महिला समोर यावी,या उद्देशाने मी विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात काम करण्याचे ठरवले आणि त्यानुसार कामाला लागले.
मला त्यानुसार वाटाही मिळत गेल्या .25 /26 डिसेंबरला साहित्य संमेलन आटोपताच जानेवारी महिन्यात माज्या ‘पोरी जरा जपून ‘कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे बारामती ,लोणावळा ,कराड, सातारा या ठिकाणी जाणे झाले. त्यावेळी मी त्या भागातील ओबीसी समाजातील लिहिणाºया लेखिका कवयित्री यांचा वेध घेतला असता त्यांची संख्या नगण्य असल्याचे लक्षात आले. मनाला खरंच खन्त वाटली. इतकी प्रतिभा असताना सुद्धा आज तीन हजार जातींमध्ये विखुरलेल्या ओबीसी लेखिकांची संख्या मात्र नितांत कमी आहे .या दिशेने काय केले पाहिजे ..?हा ही विचार मनात घोळत असतानाच पुसद येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘आम्ही लेखिका’ संस्थेच्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे मला निमंत्रण आले आणि मी ते सहजच स्वीकारले .तिथे गेल्यानंतर लक्षात आले की यवतमाळ, पुसद सारख्या भागामध्ये तांडा,पाडा, ग्रामीण व दुर्गम वस्तीवरिल जन जीवन जवळून न्याहाळणाº्या शिक्षिका, प्राध्यापिका ,डॉक्टर पदापर्यंत पोहोचलेल्या कितीतरी महिला लिहिण्यासाठी सतत धडपडत आहे… परंतु काय लिहिले पाहिजे..? ते लेखन कुठे नेले पाहिजे..? यांची योग्य दिशा नसल्यामुळे त्यांचे लेखन पुढे जात नाही .

त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देण्याकरिता काय करता येईल ..?
याचे विचार मनामध्ये सुरू असताना महिला दिनाच्या निमित्ताने पांढरकवडा ,भंडारा येथील महिलांसमोर साहित्यांच्या लेखनाबाबत प्रबोधन केले.धरमपेठ महाविद्यालय ,नागपूर यांनी महिला दिनाला आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय सेमिनारमध्ये मला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित केले, मला बोलण्याची संधी मिळाली. विषय होता “कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण”
खरंच हा विषय सुद्धा आज स्त्रियांच्या जगण्याचा अविभाज्य घटक झालेला आहे .युगानुयुगां पासून स्त्री या विषयातून बाहेरच पडू शकलेली नाही . बाहेर पडणाºया स्त्रीचे लैंगिक शोषण कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतच राहिलेले आहे आणि आजही स्त्री सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहेच आहे.. त्या अनुषंगाने स्त्रियांनी लिहितं व्हावं आणि आपल्या प्रश्नांना आपणच उत्तरं शोधावी .आपला आवाज आपल्या लेखणीतून आपणच बुलंद करावा.. हे सांगण्याकरता पुन्हा प्रकर्षाने काहीतरी करावे असे वाटत असतानाच आपल्याकडे कोरोनाचे आक्रमण झाले आणि आपण सारे लॉकडाउन मध्ये अडकलो परंतु या लॉकडाऊनच्या काळात माज्या मनातल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या आलेल्या जबाबदारीच्या जाणीवांनी मला स्वस्थ बसू दिले नाही,आणि मी या काळातही आॅनलाइन कार्य करतच राहिले.”विदर्भ” हे मी माज्या कार्याचे स्वतंत्र असे कार्यक्षेत्र ठरवले .विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत. मी खूप काही करू शकले नाही तरी विदभार्तील अकरा जिल्ह्यातील ओबीसी महिलांना लिहीत करण्याचे व्रत स्वत:ला बांधून घेतलं आणि तन-मन-धनाने त्या करता काय करता येईल या दिशेने मी कार्यरत राहिले. त्याकरिता अकरा
जिल्ह्यांच्या पातळीवर जिल्हा समूह तयार केला. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.त्या माध्यमातून लेखिकांना जुळवून ठेवण्यात आले. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 11 जिल्हा अध्यक्ष महिलांचा एक स्वतंत्र समूह तयार केला आणि त्या समूहाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा अध्यक्षांशी वारंवार सूचना करून विविध साहित्यिक उपक्रम राबवण्याचे निश्चितच केले नाही तर ते कार्य सुरूही आहे .सुरुवातीला गडचिरोली ,गोंदिया ,भंडारा या भागातल्या महिलांना ही गोष्ट म्हणजे केवळ दिवास्वप्नच वाटले. त्या मला म्हणाल्या सुद्धा “ताई ,आमच्या जिल्ह्यात तर हे शक्यच नाही .अनेक महिला लिहितात परंतु त्या तेवढ्या पुढे येणारच नाही. त्याची अनेक कारणं आहेत ”
मी म्हटले -“आपण प्रयत्न तर करून बघू या प्रयत्न करायला काय हरकत आहे ”
..आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या समूहावर मी स्वत: उपस्थित राहिले आणि प्रत्येक जिल्ह्याकडे स्वत: जातीने लक्ष दिले. त्यामुळे आज अकराही जिल्ह्यामध्ये लिहिणाº्या कवयित्री लेखिकांचे समूह तयार झालेले आहे. दिवाळी होतीच.. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक दिवाळीचा विदर्भ स्तरीय काव्य महोत्सव आयोजित केला. एक दिवस एक जिल्हा याप्रमाणेच कवी संमेलनाचे आॅनलाइन आयोजन केले. त्यांना सर्वच सूचना दिल्या. त्यांना कार्यक्रमाची पत्रिका तयार करून देण्यापासून …कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात मदत करण्यापासून तर कार्यक्रम आटोपल्यानंतर बातमी लिहिण्या पर्यंत जे जे मार्गदर्शन हवे होते, ते सारेच्या सारे जाणीवपूर्वक करत राहिली.माझ्या लक्षात आले की खरंच थोडच मार्गदर्शन मिळालं तर माज्या सख्या भरभरून लिहितात.
तिच्या लेखणी मुळे तिला सन्मान मिळत असेल तर तो आनंद शब्दातीत असतो …हे लक्षात घेत अकराही जिल्ह्यांच्या अध्यक्षांना या त्या जिल्ह्यात..या प्रकारे कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी पाठविले .नऊ जणींच्या कार्यकारिणीतील कुठल्यातरी एका पदाधिकारी ला या किंवा त्या जिल्ह्यांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून पाठविले .सर्व आयोजन केले.
पत्रिका हाती येताच “मी एका जिल्ह्या स्तरीय कवीसंमेलनाची अध्यक्ष , प्रमुख अतिथी आहे ‘ हे पाहून माझी सखी फार आनंदीत झाली.अगदी थोडं फार लिहिणारी माझी सखी मला अध्यक्षपद किंवा प्रमुख अतिथी पद लाभू शकत, ते ही दुसºया जिल्ह्यातील मराठी साहित्याच्या मंचावर हे पाहून हरखून गेली. तिचं मन भरून आलं आणि ती नव्या ऊजेर्ने नव्या जोमाने स्वत:च्या लेखनाकडे पाहू लागली. तसेच आपल्यातील लेखनाला पुढे आणण्याचाही प्रयत्न करु लागली. आणि ओबीसी महिलांच्या विदर्भाच्या पातळीवर एक सुरेख चित्र उमटवण्यात मी यशस्वी ठरले. या माज्या आनंदाला तोटा उरला नाही .
लेखनाचा उपक्रम कायम रहावा याकरता तूर्तास दर गुरुवारी *सावित्रीचा वसा* म्हणून एक व्रत सांगितले आणि त्यांना सांगितल्या गेलं ..सामाजिक जाणिवा, जगण्याचं भान आणि समाजाला काहीतरी संदेश देता येईल अशा विषयावरती एक छोटीशी कविता पण स्वत: निर्माण केलेली तुम्ही टाका .दर गुरुवारी “सावित्रीचा वसा” हा उपक्रम विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे. सर्वच महिला उत्कटपणे लिहू लागलेल्या आहेत. माज्या लेखनाचं पुढे काय होईल ? हे तिला माहित नाही ,पण मी लिहिलेली कविता चार लोकां पर्यंत जाते. भरभरून कौतुक होतं… म्हणजेच माझं लेखन योग्य दिशेने सुरू आहे .याचा तिला होणारा आनंद शब्दातीत आहे .
मागील वर्षभराच्या काळात मराठी साहित्यामध्ये आणखी बरंच काही करता आलं असतं .खरतर प्रत्यक्ष त्यांच्या भेटी घेऊन मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचे होते परंतु कोरोना मुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात ते शक्य झाले नाही तरी सुद्धा आॅनलाइन व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जेवढे करता येईल तेवढे करण्याचा प्रयास मी केलेला आहे .मी स्वत: माझी जबाबदारी ओळखून ओबीसी समाजाच्या महिलांच्या लिहित्या महिलांचं शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी स्वीकारताना लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतामध्ये घडलेल्या,मन व्यथित करणारया भीषण घटनांना कथा स्वरुपात लिहिले. त्याचा *लॉकडाऊन* शिर्षक असलेला 23 कथांचा कथासंग्रह दिनांक 15 आॅगस्ट 2020 रोजी यूट्यूब आॅनलाइन वर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध आणि लाडक्या माई आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. माज्यातली कवयत्री, लेखिका कधी म्हणून गप्प बसलीच नाही. त्याच काळात महाराष्ट्र टाइम्स’च्या वाटा आणि वळणे या सदरा अंतर्गत सामाजिक जाणिवांची जाण ठेवत आवश्यक विषयावरती लेखन केलं, हिंदी लेखनाची पूवीर्पासूनच मला आवड आहे .खरं तर भाषेवर कोणाची मालकी नसते म्हणून हिंदीमध्ये लेखनाला आलेला वेग माझा मलाच सांभाळता आला नाही .जुन्या आणि आता लिहिलेल्या अशा नवीन एकूण 68 कवितांचा ‘वजह’ हा माझा काव्य संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याच काळात वेळ मिळाल्यामुळे मराठी काव्यसंग्रहाची पण बांधणी केली जुन्या-नव्या कविता एकत्रित केल्या आणि
‘मुक्त ..मी ‘हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे, तसेच ‘वाटा आणि वळणे ‘या लेखसंग्रहालाचा संग्रह सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
या काळात प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन “पोरी जरा जपून” हे कार्य मला करता आले नाही याची मनात खंत असतानाच एक चमत्कार घडला आणि आदर्श गाव ‘पाटोदा’ जे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी जगाच्या नकाशावर आणून ठेवले .त्या गावाच्या फेसबुक पेजवर मला “पोरी जरा जपून “या विषयावर आपले विचार मांडण्याकरिता निमंत्रित करण्यात आले आणि तेव्हापासून ही शृंखला जी सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. विविध विषयांवर जवळपास 43 वेळा विविध गावच्या विविध संस्थानच्या विविध फेसबुक पेज वर मी व्याख्यान दिलीत..ज्यांना अफाट लोकप्रियता प्राप्त झाली.
निमंत्रित केलेल्या प्रतिष्ठानच्या नाव आणि उद्दिष्टानुसार माज्या व्याख्यानाचा विषय ठरवीत गेले तरी सुद्धा पूर्ण मूळ विषय ” पोरी जरा जपून” हाच राहिलेला आहे. हा विषय समाजात किती महत्त्वाचा आहे. याचा प्रत्यय मला प्रत्येक कार्यक्रम संपल्यानंतर येत असतो. अशा कार्यक्रमाची समाजाला किती गरज आहे, हे ही लक्षात येते.आज मोबाईल च्या चुकीच्या वापरामुळे उध्वस्त होणाºया किशोरवयीन मुलींची संख्या आणि त्यांच्या प्रश्नाने मी कायम व्यथित असते…मला वाटते की..ओबीसी महिलां नी अशा विषया वर लेखन करावे..प्रत्येकी च्या मनात अनेक विषय आहेत अनेक अनुभव आहेत पण असे
लक्षात येते ,की महिला आजहि मुक्त पणे लेखन करु शकत नाही.
प्रत्येकीच्या वाट्याला आलेले संदर्भ नातेवाईक वातावरण कार्यक्षेत्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे सासरचं घर,नवरा या सारख्या पातळ्यांवर तिला आधी सिद्ध व्हाव लागत.. तिच्या विचारांना कधी-कधी तिच्या घरातच मान्यता मिळत नाही ..सतत उपेक्षाच पदरी येते त्यामुळे ती लिहिण्याचे धाडस करतच नाही. त्यामुळे अशा कितीतरी महिला मनातल्या मनातच अनेक विषय घेऊन संपून गेल्या असाव्यात ..जे चित्र आज ही
फारसे बदललेले नाही. या बाबतीत विचार केला असता काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या बहुजन समाजात जाती व्यवस्थेनुसार माळी,धनगर, बंजारा, सुतार. कोळी-आगरी, भावसार, शिंपी,लोहार,सोनार, नाभिक, परीट अशा सुमारे 3744 जाती ओबीसी’मध्ये समाविष्ट आहेत .

संपूर्ण विखुरलेल्या समाजाच्या चालीरीती निरनिराळ्या असून प्रादेशिकतेच्या पातळीवर भाषा, रितीरिवाज यात फरक पडत गेला. हा विखुरलेला समाज कधीही एकत्र येऊ नये,त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना होऊ नये, कायम त्यांची वाताहतच होत राहावी… याकरिता फार मोठे राजकारण कायमच झालेले आहे .आपल्या अस्तित्त्वाची आपल्यालाच जाणीव नसल्यामुळे बहुजन समाज दिशाहीन झाला.जाती जातींमध्ये कलह निर्माण करणे, ओबीसी प्रमाणपत्र निर्माण न करणे,आरक्षणा च्या मर्यादा घालणे,ओबीसी प्रमाणपत्र व जात पडताळणीत कायम घोळ निर्माण करणे,ओबीसीच्या जनगणनेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, स्त्रियांवर अत्याचार करत राहणे, शेतात बेकायदेशीर अतिक्रमण करणे, कमी किमतीत खरेदी करणे,न्याय हक्क शिष्यवृत्ती काढून घेणे यासारखे अत्याचार कोणी तरी करत राहिले. बळी तो कान पिळी अशा समाजव्यवस्थेत बहुजन समाज पीचला जाऊ लागला. हवालदिल झाला. लाचारीने जगत राहिला. सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक अशा सर्वच पातळ्यांवरील परिस्थिती चिंताजनक असल्याचं चित्र समाजातून मिटता मिटत नाही. आजही शेतकरी कामगार किती हतबल आणि लाचार आहेत हे आपण बघतच आहोत. बळीराजाला शेतकºयाला स्वत:च्या मागण्या मान्य करण्या करता आंदोलन करावे लागते. त्या वेळेला हा प्रश्न किती गंभीर आहे. हे लक्षातच येते. जिथे पुरुष हतबल होतात तिथे स्त्रियांच्या अस्तित्वाचा आणि स्वतंत्र आत्मसन्मानाचा विचार तर फारच दूर राहून जातो. ती मनातल्या मनात धुमसत राहते. कधीकधी अश्रूंना वाट मोकळी करताना काहीबाही बडबडत असते. तो तिच्या मनातल्या उद्रेक असतो. त्या उद्रेकाला नक्कीच शब्दांमध्ये बांधता आले, तर तो महत्त्वाचा लेखाजोखा ठरेल परंतु असे होत नाही. अशा महिला साहित्या बाबत विशेष जागरूक असल्याचे दिसत नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या ओबिसी कवयित्री असून त्यांच्याच काव्यसंग्रहा बाबत, कवितेबाबत उपेक्षा होते तर आमच्यासारखी ने कसे पुढे यावे..? हीच शोकांतिका कायम मनातल्या मनात कुरतडत राहते, परंतु मला भगिनींना सांगायचं आहे. याकरता हतबल होऊन थांबून जायचं का..? तर अजिबात नाही. या सर्वांचा हिशोब विचारण्यासाठी, दंगलींचा इतिहास लिहिण्यासाठी, आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या कुटुंबातून वाहिल्या गेलेल्या रक्ताचा जाब विचारण्यासाठी, इतिहासाचा मागोवा घेत.. वर्तमानाचा हात धरून भविष्यात क्रांती सूर्यांचा प्रकाश पाहण्यासाठी क्रांती करत लेखणीचे बळ वाढविण्यासाठी लिहीतच झालं पाहिजे. लिहिणाºया ओबीसी समाजातील महिलांची अवस्था यामुळेच वाईटआहे .त्यांना कोणत्यातरी एखाद्या कळपात सामील व्हावे लागते. ब्राह्मण लेखकांची संख्या जास्त आहे यातून त्यांनी कायम एका विशिष्ट मार्गाने लेखन केलेले आहे .आंबेडकरी विचारसरणी सोसलेल्या वेदनांचा आलेख मांडत व्यवस्थेला जाब विचारते …ओबीसी मात्र या दोन्ही बाजूंमध्ये कधी या ठिकाणी तर कधी त्या ठिकाणी कायमच तळ्यात-मळ्यात होत राहिलेली आहे. तिची स्वतंत्र अशी मोट तिला बांधताच आली नाही आणि त्या दिशेने जाण्याची वाट ही निर्माण करता आलीच नाही, त्यामुळे संख्येने खूप जास्त असलेल्या ओबीसी समाजाचे साहित्याच्या प्रांतात स्वत:चे स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण झालेच नाही. त्यामुळे ओबीसी महिलांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होणे कठीणच होऊन बसले. ओबीसी समाजाच्या अठरापगड जातीं ग्रामीण परिसरात विखुरलेल्या आहेत. प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते. जातीनुसार कुलदेवता, त्यानुसार गावांमध्ये भरणाºया जत्रा आणि देवस्थाने याभोवती रोजगाराच्या संधी शोधणारा ओबीसी समाज हा कायमच धर्म कांड ,देव, देऊळ, देवालयाचे प्रश्न यात गुंतून राहिला .त्या ठिकाणी त्याला त्याच्या जगण्याच्या श्रद्धा गवसत गेल्या मग सुख दु:खाच्या काळात जोडल्या गेलेल्या अशा स्थानांना एकाएकी दूर फेकणे शक्य होऊ शकले नाही.
मनावर पिढ्यानपिढ्या चालत असलेला घरातून आलेला वसा, धार्मिक वारसा आणि पुढे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या वैचारिकतेची वाट या दोघांमध्ये चालताना ओबीसी समाजाची कुठेतरी गळचेपी होऊ लागली. काय धरावे अन काय सोडावे..? यातून स्वत:च्या मनाला शांती मिळण्याकरता नेमके काय करावे..? या प्रश्नांमध्ये त्याची मनोवस्था दोलायमान होत राहिली.
म्हणूनच ओबीसी समाजाच्या महिलांना सांगावस वाटत…
वाचनाच्या कक्षा वाढवाव्या लागतील ज्यामुळे वैचारिकता निर्माण होईल परंतु निर्माण झालेली वैचारिकता आपल्या जगण्याला तडे देणारी असेल तर असे लिहिण्यातही काही अर्थ नाही.. त्यामुळे आपल्या घराची ,समाजाची आणि स्वत:ची शांतता बघत आपण आपल्या परीने आपल्या परिघात लिहित रहावे .छत्रपती शाहू महाराजांचा तत्कालीन सांस्कृतिक पंडित यांनी केलेला छळ चीड आणणारा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून ते कार्यरत राहिले.
शाहू महाराजांना व्यसन होतं ते लोककल्याणाच….बोले तैसा चाले ही त्यांची वृत्ती होती .अंधश्रद्धा, रूढी आणि अज्ञान विरुद्ध लढा देणाºया शाहू महाराजांना स्त्रियांच्या प्रती अपार आदर होता. ओबीसी महिलांनी शाहु-फुले-आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य ,समता, बंधुभाव यावर आधारित साहित्याचे चिंतन करावे .त्या मंथनातून आजच्या प्रश्नांच्या उत्तरांना शोधण्याकरता व्यक्त व्हावे. जागतिकीकरणाच्या काळात अनेक पारंपारिक व्यवसाय बंद झालेत .नव्याने भांडवल उभारणे शक्य नाही कारण बँक तारण मालमत्ता शिवाय कर्ज देत नाही. उपजीविकेचे प्रश्न हलाखीचे होऊन आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. शिक्षणाअभावी कामगारांची संख्या वाढत आहे .
काल पाटा-वरवंटा तयार करून विकणारी माझी सखी आज रोजगार हरवला म्हणून हतबल आहे.तिची व्यथा मी माज्या एका कवितेत मांडताना मी लिहिले की…
युगायुगांपासून कायम तिच्या
दारात सुखाची नकारघंटा…
जगण्याचा प्रश्न भीषण झाला
जवा संपला तिचा पाटा वरवंटा…*

अशा व्यवसायांच्या संपण्यामुळे तिचे जगणे दुरापास्त होत गेले .ऊस तोडणी, रोजगार हमी, योजनेची कामे, हॉटेल व्यवसाय यामध्ये ओबीसी समाजाचा असलेला अशिक्षित कामगार मजुर म्हणून च राबत राहिलेला आहे. कारखानदारांनी उभारलेल्या
कापड मिल, फर्निचर उद्योग, तयार कपड्यांचे कारखाने, लोखंड उद्योग
अशा ठिकाणी कामगार म्हणून राबणे हेच त्याचे प्रारब्ध राहिलेले आहे. व्यवसाय मालक,उद्योगपती हे उच्चवर्णीय असतात परंतु काम करणारा राबणारा कामगार वर्ग हा ओबीसी असतो.
हे चित्र असेच आहे. विद्वत्तेच्या क्षेत्रातही आरक्षणाचा प्रश्?न गहन होऊन बसलेला आहे .2016 मध्ये प्रशासकीय अधिकारी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागले. रोज नवनवे येणारे नियम ,ओबीसींवर अन्याय लादत आहेत .ओबीसींना त्यांच्या हक्का पासून दूर ठेवण्यातच यंत्रणा गुंतलेली दिसते. ओबीसी समाज संख्येने तर खूप मोठा आहे ,मग त्यांचे प्रश्न का सुटत नाही..?
हा ही एक मोठा यक्षप्रश्न आहे .त्याचेही उत्तर आपण आपल्या वैचारिक, त्यातून वैयक्तिक पातळीवर लिहू शकतो. सामाजिक संघषार्साठी लढणारा सैनिक जिवंत असावा ,असे वाटत असेल तर लिहिणे आवश्यक आहे .राजकीय हेतूंनी जातीयवादाच राजकारण होतं.नेते स्वत:चा सर्व प्रकारचा उत्कर्ष साधतात आणि ओबीसी समाज पुन्हा एकदा होतो नेहमीसारखाच उदास आणि भकास…

माज्यातल्या मला या सर्व प्रश्नांची जाणीव झाल्यामुळे ओबीसी लिहित्या महिलांची एक चळवळच उभी व्हावी ,असे मला असे वाटते. त्या दिशेने विचार केल्यास ओबीसी महिलांची साहित्य परिषद निर्माण व्हावी.यात महिलांचा स्वतंत्र विचार व्हावा आणि विविध उपक्रम राबविले जावेत.त्यामुळे ओबीसी महिलांचे साहित्य समाजापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न होतील. ते प्रकाशित होत राहतील .जुन्या ओबीसी महिलांच्या साहित्यांची प्रदर्शने भरविली जावीत .त्यात जुन्या ओबीसी महिला साहित्यिकांचा सत्कार केला जावा आणि साहित्याचा अभ्यास करणाºया संशोधकांना उपयोग व्हावा याकरता महिला साहित्याचे स्वतंत्र असे ग्रंथालय निर्माण व्हावे .साहित्य परिषदेच्या उपक्रमांतर्गत ओबीसी महिला साहित्याचा शोध घेऊन त्यांच्या साहित्याचे संशोधन व्हावे .ओबीसी महिला संस्कृती सूची तयार व्हावी. आणि योग्य दिशेने मार्गदर्शन होत राहावे. ह्याकरता बरंच काम करण्यासारख आहे आणि यापुढच्या काळात त्या दिशेने कार्यरत राहण्याचा माझा मानस आहे.
तसं पहिल तर मागे वळून पाहताना लक्षात येते की बहुजन समाजातील महिलांचे लेखन कार्य हेतूपुरस्पर दडवून ठेवत स्त्रियांना दडपून टाकण्याचे कार्य होत आलेले आहे. बहुजन समाजातील स्त्रियांचे इतरही कार्य त्यामुळे समाजापुढे येऊ शकले नाही. बहुजन समाजातील स्त्रियांच्या लेखनाच्या कक्षा आत्ता कुठे विस्तारू लागलेल्या आहेत,तरीही कितीतरी काळ त्यांना ,त्यांनी लिहिलेल्या कथा ,कविता ,लेख यांचे काय करावे? कुठे प्रकाशित करावे,याबाबत काहीच कळत नव्हते, साºया निबंर्धांमध्ये जखडलेले जगणेच त्यांच्या वाट्याला येणे हे जणू स्त्री चे प्रारब्ध होते. रांधा,वाढा,उष्टी ,खरकटी, व्रतवैकल्यं, सणवार, नातीगोती या सर्वांमधून स्त्रियांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन अजूनही पाहिजे तसा बदललेला नाही. वर वर ती काटक झालेली आहे,आपले कर्तव्य अधिकार समजू लागली आहे, असं वाटत असतानाच घरदार तुटू नये म्हणून शेवटी तडजोड स्वीकारतेच ….त्याकरता कधीकधी तिचे प्रवाह थांबून जातात पण संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव असलेल्या काही स्त्रिया पारंपरिक चौकटीला छेद देत स्त्री सक्षमीकरणाचा कौल सांभाळत चौकटीबाहेरचा लेखन प्रखरपणे करू लागलेल्या आहेत ,पण त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यांच्यावरही टीकेची प्रचंड झोड उठते. त्यांना वाळीत टाकले जाते. तरीपण स्वत:तील तसलीमा नसरीन आणि मलाला त्या जिवंत ठेवण्याचा प्रयास करतात .स्त्रियांचा एक मोठा वर्ग आज कथा, नाटक, कादंबरी हा बाजही पेलत आहे. ही जमेची बाजू म्हणावी लागेल…..

एवीतेवी घरातला विरोध सांभाळून घराबाहेर पडणारी स्त्री अचानक बाहेरचे राजकारण,स्पर्धा, हेवेदावे, मत्सर पाहून घाबरून जाते. कधी कधी थांबून जाते .खरंतर हे व्हायला नको . अनेकदा स्त्री ही स्त्रीची शत्रू असल्याचे लक्षात येते. स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आपण मांडल्या तर स्त्रियांनी स्त्रियांना सहकार्य केले पाहिजे स्त्रीची पाठराखण केली पाहिजे परंतु स्त्रिया स्त्रियांचा द्वेष मत्सर करताना दिसतात ते पाहून वाईट वाटते .खरं तर हे व्हायला नको..पण होत आहे…
म्हणून स्त्रीने एक जाणीव कायम ठेवावी की कोणी कितीही पाया ओढू देत …आपले लक्ष समोरच असू द्यावे ..कारण पाय ओढणारे नेहमी खालच्या पायरीवर असतात.. कायम पुढे जाण्याचा ध्यास ठेवावा.. स्वत:ला इतक्या उंचीवर न्यावे की लोक तुम्हाला शोधत येथील .खरंतर हा प्रवास कठीण आहे .सोसण्या ला ही मयार्दा असतातच पण जो सोसतो तोच घडतो..सोसण्याचे विष नाही तर अमृत होते …संवेदनांचे आभाळ मग सहजच पेलता येते. आभाळातून बरसणा?्या संवेदन सरींमध्ये जो भिजतो ,जो रुजतो, तोच बहरतो हेच माज्या ओबीसी लिहित्या महिलांना मला मनापासून कळकळीने सांगायचे आहे….या वाटेवर माज्या सख्यांनो आपल्या सगळ्यांचे बळ मला हवे आहे.

आपला स्नेह ,जिव्हाळा ,प्रेम या भावना विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचतात.. माझ्या
सख्या माझ्यावर कळवळून
कविता लिहितात ,त्या वेळेला
खरच भारतातील पहिल्या महिला साहित्य संमेलन पदाचा पदभार स्वीकारल्यापासून एका वर्षाच्या काळात मला स्वतःला तुमच्याकरता बरंच काही करता आलं याचा आनंद मिळतो. चंद्रपूरच्या रत्नमाला धुर्वे
यांनी लिहिलेली ही कविता मला माझ्या जगण्याचं बळ वाढवणारी वाटते. त्या लिहतात
*प्रिय विजया ताई*
सहज होऊन बोलता…
पण ह्रदयात हात घालता…
एवढं मोठं धनुष्य तुम्ही
सांगा कसं हो पेलता…
प्रत्येकीच्या वयात शिरता..
मैत्रीच्या प्रगतीचा ध्यास धरता..
घरातलही घरपण सहजच
कसं हो जपता..
कविता ऐकता कैक ह्रूदयाची
पण साद मात्र अलगद झेलता..
एवढं छान कसं हो खेळता…
प्रत्येकीला बळ देता…
साधं सोज्वळ रूप तूमचं..
मनाच्या ठावाचं वेध घेतं..
कुठल्या पार्लरमध्ये
तुम्हाला हो कोण नेतं…
असा किती बरे..भांडार
सद्गुणांचा..
वाटुन ही न पडे रिता..
सांगा हो कुठल्या
ब्रँडचं बाळकडू पीता…
असाच हात ठेवा आमच्यावर..
मैत्रीच्या या नात्यावर..
सदा प्रेम वाढो
आमच्या मात्र खात्यावर……
रत्नमाला धुर्वे
मनात आला लिहलं…… चुकल्यास क्षमा असावी.
अशा नित्य प्राप्त होत असलेल्या प्रतिक्रिया माझ्या कार्याचं बळ होत चाललेल आहे .त्यामुळे माझ्या ओबीसी महिलांची लेखणी प्रगल्भ व्हावी पुढे यावी लिहत रहावी… याकरता मला जे करता येईल ते मी नक्कीच करत राहणार आहे. कारण हे सगळं करताना माझाही त्यात एक स्वार्थ आहे आणि तो असा की यामध्ये मला भरभरून आनंद मिळत असतो .त्या आनंदाबाबत मला नेहमीच असे वाटत असते की…
*उपभोगू नये कधी*
*आनंद एकट्याने …*
*मिळतो पुन्हा पुन्हा*
*आनंद वाटल्याने….*
आणि म्हणूनच हा आनंद प्रसादा सारखा वाटुन आपले जगणे प्रासदिक व्हावे.हा माझा प्रयास असेल.
सर्व लिहित्या भगिनिंच्या लेखणी चे बळ वाढो..अशा मनापासून शुभेच्छा देते..आणि थांबते..
धन्यवाद….!
प्रा.विजया मारोतकर
अध्यक्ष,
पहिले ओबिसी महिला साहित्य संमेलन ,2019
नागपूर