जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी वेतनापासून वंचित

मागील तीन-चार महिन्यांचा पगार हाती न आल्याने कर्मचारी त्रस्त

442

विदर्भ वतन न्यूज पोर्टल.प्रतिनिधि नागपूर: राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना शासनाने मागील 3-4 महिन्यांपासून निधि नसल्याचे कारण सांगून पगारच देण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचा-यांचा दिवाळीसारखा सन अंधारात गेला असून मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा राहिला आहे.
संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हयात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत असून जवळपास 650 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.शासनाने वेतनासाठी निधी उपलब्घ केला नसल्याने सर्वांचे तीन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. याबाबत वरिष्ठांना अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे शिष्टमंडळ शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे. वेतन होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने व वारंवार असा प्रकार घडत असल्याने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर, नागपूर येथील कर्मचा-यांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसह संस्थेच्या प्राचार्या हर्षलता बुराडे यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगीतली. कुटुंबीयांनी याबाबतचे लेखी निवेदन प्राचर्यांना सादर केले असून या आठवडयाभरात वेतन देण्यात न आल्यास मुलांबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.