
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : (दि. 20डिसेंबर)-नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संघटनेतर्फे “नाभिक समाज भूषण” हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.यंदाचा पुरस्कार हा मा. प्रा प्रकाशराव श्रावण सोनवणे, शेवाळी मुळगाव तामसवाडी ता.साक्री जि धुळे यांना नुकताच जाहीर करण्यात आला. समाज भूषण पुरस्कार देण्यामागे उद्देदेश हाच असतो की, आपला समाज एकत्र यावा. त्यातून प्रेरणा मिळावी. शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक बदल घडावा. त्यातून विकास साधला जावा. चांगलं काम करणारी व्यक्तीही त्या समाजासाठी भूषणच असते.
प्रा. प्रकाशराव सोनवणे यांच्या बद्दल काही सांगायचे झाल्यास त्यांचा जन्म शेवाळी येथे एका गरीब कुटुंबात झाला.वडीलांचा लोहारकीचा व्यवसाय आणि संघर्षातला संसार यातच त्यांचं बालपण आणि शिक्षण झालं. प्रकाशराव हे दोन भाऊ आणि चार बहीणी अशा सहा भावंडांमध्ये ते वाढले. हलाकीचं जगणं काहींनी कुठेतरी वाचलेलं असतं पण यांनी स्वत: अनुभवलेलं आहे. जीवनातले चढउतार अगदी जवळून पाहिले आहेत . सर्व भावंडांनी चांगलं शिक्षण घेऊन आज शासकीय सेवेत स्थिरस्थावर झाले आहेत. तामसवाडी या मुळ गावी त्यांनी सन१९९१-९२ मध्ये शाळा सुरू केली. अनेक विरोध पचवत पचवत ती आज नावारूपाला आलेली आहे . गावासाठी काहीतरी करावं ही ऊर्मीच खूप मोठी आहे. त्यातूनच दोन शाळा उभ्या राहिल्या त्यात अनेक पिढया शिकून मोठ्या झाल्या. माझंही शिक्षण याच शाळेत झालं. अण्णासाहेब त्या काळात १५ आॅगस्ट, २६जानेवारीला मुंबईहून शाळेत खास पाहुणा घेऊन यायचे. या गोष्टीचं मला खूप अप्रूप वाटायचं.काही कणसे जशी दाणेदार असतात तशी काही माणसे बाणेदार असतात आणि या बाणेदार माणसाची त्यावेळची, त्या काळची, त्या परीस्थितीतली सामोरं जाण्याची शैली आणि लकबीचा हेवा वाटायचा.पाटील वाडयातली शाळा सुरू ठेवण्यापेक्षा बंद पाडणा-यांचाच गट मोठा होता. पण असं म्हणतात की, प्रकाशाच्या वेगाशी कोणतीच मानवी यंत्रणा स्पर्धा करू शकत नाही, तसं याही प्रकाशाला थांबवणं तितकसं सोपं नव्हतं ही भाबडी कल्पना सगळयांची दूर झाली. याच काळात स्व.पी.के. अण्णा पाटील. यांचीही मोलाची साथ लाभली. त्यांच्या मदतीने बरंच काम सोपं झालं. पुढे कार्यक्षेत्र मुंबईच ठरली. मुंबईत जाऊन गर्दीचा एक हिस्सा न होता आपला वेगळा ठसा उमटवला . प्रख्यात भवन्स कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली. तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे राज्य सरचिटणीस म्हणून ते आजही काम पाहत आहेत. अण्णासाहेब प्रकाशराव सोनवणे यांना हा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला मनस्वी आनंद वाटला मी अण्णासाहेबांच्या वतीनं सर्व नंदुरबार जिल्हा कर्मचारी संघटनेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सल्लागार व सर्व सभासद सदस्य यांचा आभार मानतो. पुरस्कारामुळे निश्चितच जबाबदारी वाढते. जबाबदारी कशी पेलावी आणि झेलावी याचं बाळकडू आण्णासाहेबांना फार पूर्वीच मिळालं आहे. यंदाचा समाजभूषण पुरस्काराचा टवटवीत आणि लालभडक गुलाब अण्णासाहेबांच्या कोटाला खोवला जाईल. वितरण सोहळा आणि टाळ्यांचा कडकडाटा सोबत मंद समई, धुंद सनई मला ऐकू येत आहे व्वा. !

