विदर्भ वतन न्यूज पोर्टल, यवतमाळ प्रतिनिधी :
कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा (23 नोव्हेंबर) सुरु झाल्या आहेत. ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्या नंतर सोमवारी 36 पैकी 14 जिल्ह्यांमधील शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. त्यानुसार नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरवण्यात आले. पहिल्या दिवशी राज्यभरात 88 हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. ज्या 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये यवतमाळचाही समावेश आहे. जिल्ह्यात जवळपास 600 हून अधिक शाळा उघडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. पालकांची संमती असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश पालकांनी हे संमतीपत्र दिले नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले आहे.
यवतमाळमधील शिक्षकांची संख्या 3 हजार 397 इतकी असून त्यापैकी 2 हजार 600 शिक्षकांची तपासणी करण्यात आली होती. यातील 81 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले. शिक्षकांची आरोग्य तपसणी केली जात असून 81 शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आपल्या पाल्यालादेखील कोरोनाची बाधा होऊ शकते, अशी धास्ती पालकांच्या मनात असल्याने पहिल्या दिवशी शाळांमध्ये खूपच कमी विद्यार्थ्यांची संख्या पाहायला मिळाली.

