Home Breaking News सामाजिक संवेदनांना मांडणारा “दैव” कथासंग्रह : सुनील जवंजाळ

सामाजिक संवेदनांना मांडणारा “दैव” कथासंग्रह : सुनील जवंजाळ

151 views
0

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल,  साहित्यविश्वात सातत्याने नवनवीन साहित्य बहराला येत आहे.अनेक नवोदित लेखक आपल्या अनुभवांना लेखणीच्या माध्यमातून पानावरती उतरवत आहेत. अनेकांसाठी अनुभवांचा खरा आदर्श निर्माण करत आहेत. आपल्या जगण्यातील वास्तवाला  साहित्याच्या रुपाने लोकांसमोर ठेवणे तितके सोपे नाही. प्रत्येकाच्या नशिबात विविध प्रकारच्या त्रासांचे भोग  असतात. परंतु भोगलेले सगळंच कागदावरती उतरवणे फार कठीण असतं. सध्या साहित्यात नवीन लिहिणाऱ्या हातांकडून खूपच आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. शब्दांच्या माध्यमातून वास्तवाला भेट देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणी मध्ये उतरत आहे. स्वतःला व्यक्त करत अनेकांना मार्गदर्शक जगण्याची अनुभूती अशा लेखकांच्या माध्यमातून निर्माण होत आहे. संवेदनशील लेखनाच्या माध्यमातून समाजमनात परिवर्तनशील विचार पेरणारे मंगळवेढा येथील कवी व लेखक धनंजय शंकर पाटील यांचा “दैव” हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. स्वतःच्या आयुष्यात जे घडलं, जे पाहिलं त्याचं प्रतिबिंब “दैव” या कथा संग्रहाच्या माध्यमातून साकारले आहे.

          ‘दैव’ या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत. विविध प्रकारच्या सामाजिक विषयांचा आशय दमदारपणे मांडण्याचा प्रयत्न या कथांमधून होत आहे. काही कथांमध्ये भाषेच्या प्रगल्भतेचा अंश कमी असताना दिसतो, परंतु कथेच्या आशयातून या गोष्टींकडे वाचकांचे सहजच दुर्लक्ष होते. ग्रामीण जीवनाचा लेखाजोखा विविध कथांच्या माध्यमातून मांडला आहे.
          या संग्रहातील “सल” पहिलीच कथा शेतकऱ्याच्या जगण्यातील हतबलता मांडते.खरतर सावकारीत अडकलेल्या शेतकऱ्यावर निसर्गही कोपतो. त्यामुळे रामाच्या जगण्यात शेवटी अंधार कसा माजतो याचे वास्तववादी चित्रण या कथेच्या माध्यमातून केले आहे. महाराष्ट्रात सावकारी मुळे व निसर्गाच्या अवकृपेमुळे असंख्य आत्महत्या झाल्या आहेत.समाजातल्या या वास्तव प्रश्नांकडे लेखकांनी लक्ष दिले आहे.
 “आधार” या कथेच्या माध्यमातून एक अनोखी प्रेम कहानी लेखकांनी मांडली आहे. सायली व सम्राट यांच्या  जीवन प्रवासाचा पट उलगडत असताना आपण स्वतः या सगळ्या गोष्टी अनुभवत असल्याचा भास वाचकांना होतो. या कथेमध्ये असलेली भाषा ही साधी सरळ व सोपी असल्यामुळे व कथेतील संवाद हा डोळ्यासमोर चित्र उभा करणारा आहे. सायली व सम्राट यांच्यातील नात्यांचा आदर्श आजच्या कुटुंब व्यवस्थेसाठी खूपच महत्त्वाचा ठरेल.
अकाली बायकोच्या जाण्यानंतर आपल्या दोन मुलींसाठी बापच आई आणि बाप ठरतो.अनेक संकटांचे पहाड फोडत बाप शोभा आणि कमला या आपल्या दोन मुलींसाठी जगत राहतो. समाजात माणुसकीच्या नात्यामुळे सगळ्या गोष्टी तरुण जातात यावर रामन्नाचा दृढ विश्वास असतो. रक्तदानानंतर निर्माण झालेला प्रसंग व शेवटी शाळेत मिळालेली शिपाई ची नोकरी या दोन्ही गोष्टी हरत चाललेल्या माणसाला जिंकायला भाग पाडतात.
           सामाजिक कथां बरोबरच लेखक धनंजय पाटील यांनी भय कथेचा ही एक वेगळा पॅटर्न या संग्रहात वापरला आहे. स्वतःची डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी सदाशिवने रात्रीत केलेला संघर्ष. शेतकऱ्यांवर येणाऱ्या विविध प्रकारच्या संकटांची जाणीव करून देणारा आहे.भयान अंधारात रानाकडे चालत असताना पायाखाली कधी काटे येतात तर कधी भुजंग येतात पण या कोणत्याच गोष्टीना न घाबरता शेतकरी प्रचंड धीराने शेतातील पीक वाचवण्याची धडपड कसा करतो याचा संघर्षमय वृत्तांत या कथेच्या माध्यमातून वाचकांसमोर येतो. त्या भयाण रात्री डाळिंबाच्या बागेला पाणी मिळाले नसते तर कर्जाच्या ओझ्याखाली सदाशिव चे जगणेच संपले असते. शेतकऱ्यांच्या जगण्याला उभारी देणारी ही कथा निश्चित पणाने वेगळी ठरते.
          सध्याच्या ग्रामीण भागात बदलत जाणारी राजकीय व्यवस्था आणि शिक्षणाचा यथायोग्य उपयोग गावाच्या विकासासाठी केला पाहिजे असा संदेश देणारी “अखेरचा श्वास” ही कथा निश्चितच गावगाड्याच्या विकासाला प्रेरक आहे.गावातील राजकारणा बरोबर समीर पाटील आणि यमुना अक्का यांच्या संवेदनशील नात्याचा परामर्श या कथेच्या माध्यमातून वाचकांसमोर येतो. या कथेतील आईचं जाणं मनाला चटका लावून जाते. रद्दी विकत घेणारे माधव काका आपल्याकडे आलेली पुस्तक  तरुण पिढी व गावकरी मंडळींसाठी ते जतन करून ठेवतात., आणि एक सुंदर वाचनालयाची वास्तू उभी करतात. मोबाईलने पछाडलेल्या या पिढीला घडवण्यासाठी वाचनाची  प्रचंड गरज आहे.वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी “वाचनक्रांती” या कथेच्या माध्यमातून प्रयत्न झाला आहे. शिवानीच्या जगण्याची परवड “व्यथा अनाथांची” या कथेच्या माध्यमातून समोर येते.खरंतर अनाथालयाला भेट दिल्यानंतर तिथली भयानक वास्तवता या कथेच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभी राहते. समाजाच्या मनामध्ये सहानभूतीचा भाव निर्माण करणारी ही कथा आहे.
         “भरारी” या कथेच्या माध्यमातून अपंग असणाऱ्या नायिकेच्या जिद्दीची कहाणी  सुंदर शब्दात व्यक्त केली आहे.धडधाकट असणाऱ्या समाजातल्या आळशी लोकांसाठी या कथेच्या माध्यमातून प्रभावी संदेश देण्यात आला आहे.”कला”ही प्रातिनिधिक स्वरूपाचे असणारे पात्र. या पात्राच्या माध्यमातून समाजातल्या असंख्य अपंगांना बळ देण्याचा प्रयत्न या कथेच्या माध्यमातून झाला आहे. शिक्षणासाठी बाहेर गावी राहणाऱ्या गण्याच “सपान” कशा पद्धतीने पूर्ण होतं. बाहेरगावी राहताना आपल्याला कोणत्या आणि कशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागत. मनातील घालमेल आणि शाळेतील विविध प्रसंग यातून ही कथा पुढे येते. कथेचा शेवट गोड असला तरी काही अंशी “योगायोगाचे” सुर लेखकाने जुळवले आहेत. एका प्राथमिक शिक्षकाने प्रचंड मेहनत घेऊन एका अंध मुलीला हे जग दाखवले.निश्‍चितपणे अंधारात हरवलेल्या एका पणतीला उजेडात आणण्याचं काम या शिक्षकाने केले आहे.विक्रम या शिक्षकाने अर्चना साठी केलेले कार्य निश्चितपणे सर्वांसाठी आदर्शवत आहे.
        समाजात विविध प्रकारच्या चुकीच्या रूढी-परंपरा अजूनही चालू आहेत. या रूढी परंपरेच्या माध्यमातून अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत.”दैव” या कथेच्या माध्यमातून सुजा व सुजाताची आई राणी यांनी हुंडा पद्धतीचा बिमोड करण्यासाठी प्रचंड मोठे कष्ट सोसले आहे.इतरांच्या आयुष्यात झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी सुजा उभारते ही या कथेतील सर्वात महत्त्वाची बाजू आहे.नशिबाने अनेकांच्या जगण्यात अनेक गोष्टी घडतात. तो दैवविलास असतो. “दैव” कथा ही संघर्षमय जगणाऱ्या अनेकांना प्रेरित करणारी आहे.
        धनंजय पाटील यांचा ‘दैव’ हा दुसरा कथासंग्रह आहे. कथासंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे सामाजिक संदेश अतिशय दमदारपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. काही कथांमध्ये थोड्याफार प्रमाणे प्रमाणात प्रसंग व त्यातील शब्दांची फसगत झाली आहे परंतु कथेचा आशय दमदार असल्यामुळे या गोष्टी सहजतेने वाचकांच्या लक्षात येत नाहीत .एकंदरीतच या कथासंग्रहाच्या माध्यमातून धनंजय पाटील यांनी सामाजिक संवेदनांना वाचकांच्या मनापर्यंत पोचवण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला आहे. थिंक टँक पब्लिकेशन, सोलापुराच्या वतीने पुस्तकाची बांधणी  व निर्मिती  सुंदर करण्यात आली आहे. कोपरगावचे  अरविंद शेलार  यांनी  काढलेले मुखपृष्ठ ‘दैव’  या  शिर्षकाला  समर्पक  असे आहे.अर्पण पत्रिका नंतर  प्रस्तावना असायला हवी होती,  त्यानंतर  लेखकाचे मनोगत व अभिप्राय असायला हवा होता तसेच  लेखकाचा परिचय हा शेवटच्या पानांमध्ये असायला हवा होता.पण या गोष्टींकडे  कदाचित धनंजय पाटील यांना मार्गदर्शन करणाऱ्या जाणकारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. निश्चितपणे यापुढील काळात धनंजय पाटील यांच्या माध्यमातून  साहित्याची सेवा प्रगल्भपणे घडेल यात कसलीच  शंका नाही.त्यांनी लिहिलेल्या कथा  या  समाजाला दिशादर्शक ठरणाऱ्या आहेत. पुन्हा एकदा  त्यांच्या साहित्यकृतीला व पुढील लिखाणास मनःपूर्वक शुभेच्छा !!!