
स्वातंत्र्यानंतर आजपावेतो बलुतेदार समाज हा शासनाच्या सर्व सावलातींपासून वंचित आहे. या समाजाचा अंतर्भाव खऱ्या अर्थाने S.C. प्रवर्गात होणे आवश्यक होते. इतर राज्यात हा समाज S.C. मध्ये मोडतो मात्र महाराष्ट्रात या समाजावर अन्याय होतो आहे ही खेदाची बाब आहे. हा समाज ओबीसी वर्गात आल्या पासून कोणतीही राजकीय संधी बलुतेदारी वर्गास मिळाली नाही याचे शल्य प्रत्येक बलुतेदार बांधवांच्या मनात आहे. बलुतेदार बांधव “Atrocity” कायद्याची मागणी करीत असूनही सर्व सत्ताधीश मात्र मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामीण पातळीवर आमचा मागासवर्गीय बांधव (S.C.) आज सुखासमाधानाने जगत असताना मात्र बलुतेदार समाजास मानहानी चे जीवन जगावे लागत आहे ही शरमेची गोष्ट आहे. बलुतेदारी समाजाची ओळख ही त्याच्या जाती वरूनच होते व त्याच जाती वरून त्यास हाक मारली जाते, वेळ प्रसंगी जातीवाचक शिवीगाळ केली जाते. मात्र कायद्याचे सौरक्षण नसल्याने त्यांना खेड्यात अपमानित व्हावे लागते हे आमचे दुर्दैव आहे ! यात फक्त उच्चवर्णीयच नाहीतर ताकतीने मोठे असलेले आमचे ओबीसी बांधवही आमची जात काढायला अग्रेसर असतात ! हे आम्ही अजून आम्ही किती पिढ्या सहन करावे ? आज “आहेरे” च्या ताटात अजून वाढले जाते आहे व “नाहीरे” कडे पिढ्यान् पिढ्या दुर्लक्ष
केलं जातं आहे. त्यामुळे ओबीसी मधील इतर समाज घटकांवरही आमचा विश्वास राहिला नाही. जर काही मिळालं तर ते प्रथम आपल्या ताटात ओढतात व काही शिल्लक राहीलच तर आमच्या ताटात ही त्यांची भूमिका आहे !
धनगर बांधवांना वेगळे आरक्षण ! अजुन काही समाजाला वेगळे आरक्षण ! मग आम्हाला का नको ? इतर राज्यात हा वर्ग “Most backward” मध्ये गणला जातो व इतर काही ज्यादा सवलती या वर्गास मिळतात. कमीत कमी ओबीसी मधील काही ठराविक वाटा तरी या वर्गासाठी “राखीव” असावा अशी भूमिका माजी खासदार हरिभाऊ राठोड व बलुतेदार वर्गाचे नेते प्रा. प्रकाश सोनवणे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषदेत मांडली व या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. राठोड यांनी दिले असून लवकरच या संदर्भात मा. मुख्यमंत्री महोदयां ची भेट घेण्याचे ठरले आहे. दिनांक २० ऑक्टोबर रोजी या भूमिकेच्या समर्थनार्थ त्यांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस ओबीसी व बलुतेदार समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

