हिंदु धर्मग्रंथांचा अवमान करणार्‍या ‘केबीसी’ आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदु समाजाची जाहीर माफी मागावी ! 

237
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : ‘सोनी टीव्ही’वरील ‘कौन बनेगा करोडपती – सीझन 12’ (केबीसी) या कार्यक्रमाच्या 30 ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या ‘कर्मवीर विशेष’ या भागात हिंदु धर्मग्रंथांविषयी विकल्प आणि नकारात्मकता पसरवणारा प्रश्‍न विचारून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा पुन्हा एकदा अवमान करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालक  अभिनेते  अमिताभ बच्चन  यांनी या वेळी ‘25 डिसेंबर 1927 या दिवशी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि  त्यांचे अनुयायी यांनी कोणत्या धर्मग्रंथांच्या प्रती जाळल्या ?’ असा प्रश्‍न विचारून त्याच्या उत्तरासाठी ‘विष्णुपुराण’, ‘भगवद्गीता’, ‘ऋग्वेद’ आणि ‘मनुस्मृती’ असे पर्याय दिले. या प्रश्‍नातून अमिताभ बच्चन आणि ‘केबीसी’ यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे ? यानंतर बच्चन जातीगत भेदभाव आणि अस्पृश्यता यांना वैचारिक दृष्टीने अनुचित ठरवण्यासाठी मनुस्मृतीवर टीका केली आणि त्याचे दहन केले, असे सांगत समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते. या प्रकरणी ‘केबीसी’ आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदु समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

मागील वर्षीही केबीसीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत हिंदु राष्ट्रपुरुषांचा अपमान केला होता, आता पुन्हा हिंदु धर्मग्रंथांबद्दल अयोग्य माहिती सांगत मनुस्मृतीचा अपमान केला आहे. 1927 मध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले; मात्र यानंतर म्हणजे 11 जानेवारी 1950 यादिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, ‘मी जातीनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. तसेच दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.’ तसेच दहन करण्यापूर्वी आपण मनुस्मृती हा ग्रंथ वाचला नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. यातूनच मनुस्मृतीचे महत्त्व बाबासाहेबांनी अधोरेखित केले होते. या घटनेतून केबीसीच्या हिंदुविरोधी वृत्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. जर हिंदु धर्मग्रंथ डॉ. बाबासाहेबांनी दहन केला, हा प्रश्‍न केबीसीमध्ये विचारला जात असेल, तर ‘तक्षशिला’ आणि ‘नालंदा’ ही हिंदूंची प्राचीन विश्‍वविद्यालये अन् त्यांतील अमूल्य ग्रंथसंपदा कोणी जाळून कायमची नष्ट केली ?’, ‘अफगाणिस्तानातील बामियान येथील प्राचीन बुद्धमूर्तींचा विध्वंस कोणत्या धर्मग्रंथांचे अनुसरण करणार्‍यांनी केला ?’ ‘चार्ली हेब्दो’वरील आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांनी कोणत्या धर्मग्रंथांतून प्रेरणा घेतली ?’ अशा प्रकारचे अन्य पंथियांविषयीचे प्रश्‍न विचारण्याचे धाडस केबीसी आणि अमिताभ बच्चन करतील का ? हेतूतः हिंदु धर्म, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्‍या ‘केबीसी’ आणि ‘सोनी टीव्ही’ यांचा हिंदु समाजाने निषेध करावा आणि संस्कृतीरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी या वेळी केले.