कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या संस्थेवर आणि अशा संस्थांना अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

271
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मोशी येथील मागासवर्गीय वसतीगृहात अलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्णांना अन्नपदार्थ पुरवणार्‍या ‘टॅब किचन’ या संस्थेकडे अन्न पुरवठ्याचा परवाना नसतांनाही त्यांना अनुमती देण्यात आली; या संस्थेने पुरवलेल्या अन्नामध्ये चक्क अळ्या सापडल्या आहेत. असे असतांना अन्न आणि औषधी द्रव्ये प्रशासन विभागाने या संस्थेवर केवळ 11हजार रुपयांचा दंड अन् या संस्थेचे कंत्राट रहित करण्याची कारवाई केली; प्रत्यक्षात कायद्यातील तरतुदीनुसार या संस्थेवर 5 लाख रुपयांचा दंड आणि संस्थाचालकास 6 महिन्यांची कैद होणे अपेक्षित होते! त्यामुळे इतकी गंभीर घटना घडूनही इतकी सौम्य कारवाई का करण्यात आली, असा प्रश्‍न ‘आरोग्य साहाय्य समिती’चे श्री. चैतन्य तागडे यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे.

श्री. तागडे यांनी ‘मुळातच परवाना नसणार्‍या ‘टॅब किचन’ संस्थेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंत्राट कसे काय दिले ?’, ‘दोषी संस्थेवर नियमानुसार कारवाई का करण्यात आली नाही ?’, ‘अनुमती देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर काय कारवाई करण्यात आली ?’ असे प्रश्‍न उपस्थित करत, हे सर्व अनाकलनीय असून या सर्व प्रकारातून संस्थाचालक आणि पालिका प्रशासनातील अधिकारी यांचे काही साटेलोटे आहे का,अशी शंका व्यक्त केली. तरी हा प्रकार अत्यंत गंभीर असून कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे.त्यामुळे अन्न पुरवठादार संस्था आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने श्री. तागडे यांनी केली

आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने 28 ऑक्टोबर या दिवशी अन्न प्रशासन, पुणे परिमंडळ 2 आणि 4 चे साहाय्यक आयुक्त बा.. ठाकूर यांना, तसेच पिंपरीचिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या नावे असलेले निवेदन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना देण्यात आले. या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. बा.. ठाकूर यांनी ‘चौकशी कायद्यानुसारच झाली आहे. तरीही या प्रकरणाची परत एकदा चौकशी करून कॅन्टीन मालक दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल’असे आश्‍वासन दिले.