
विदर्भ वतन न्युज पोर्टल : गोंदिया जिल्हा प्रतिनिधी राधाकिसन चुटे
गोंदिया:. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी महापूर आला. यात तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १८ गावांना फटका बसला. महापुरामुळे शेतातील संपूर्ण पीक उध्वस्त झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आले. पश्चिम महाराष्ट्रापासून ते स्थानिक पातळीवरील मंत्री आणि नेत्यांनी दौरे केले. तात्काळ मदतीचे आश्वासनही दिले. मात्र दीड महिना लोटून देखील एकाही शेक-याला आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे यंदाची शेतक-यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. गोंदिया तालुक्यातील कासा या गावात संदीप तिवारी शेतकरी आहे. त्यांच्याकडे ५० एकर शेती आहे. महापुरामुळे ४९ एकर शेतीवरील पीक नष्ट झाले. यात तिवारी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय बँकेचे कर्ज आता भरायचे कसे ? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकार संपूर्ण नुकसानीचा मोबदला देणार नसले तरी तात्काळ काही प्रमाणात आर्थिक मदत करेल या आशेवर त्यांच्यासह इतरही शेतकरी होते मात्र या आशेवरही सरकारने पाणी फेरले त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये सरकारविरोधात रोष दिसून येत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. मात्र पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पाहणी केली नाही. त्यामुळे सरकार शेतक-यांविषयी गंभीर आहे का ? असा सवाल शेतक-यानी केला आहे.

