महाराष्ट्राच्या राज्यपालांना बडतर्फे करा : जयदीप जोगेंद्र कवाडे यांची मागणी.

309
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर :- दि.२२. संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे. राज्याला महामारीने ग्रासलेले असताना मंदिरासारखी सार्वजनिक आणि हमखास गर्दीची ठिकाणे उघडण्याचा अनाठायी सल्ला राज्यपाल महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्राने दिला आहे. इतकेच नव्हे, तर ते पत्र जाहीर केले आहे. त्या पत्रातील भाषा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी आहेच, त्याशिवाय, त्यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याचा दिलेला अनाहूत सल्ला राज्याच्या आरोग्यव्यवस्थेसाठी अतिशय धोकादायक आहे. मंदिरे उघडण्याच्या मागणी पाठोपाठ मशिदी, चर्च, गुरूद्वारे आणि अन्य सार्वजनिक प्रार्थनास्थळे खुली करावीत, अशी मागणी सर्व धर्मांतील हितसंबंधी मंडळी करू लागतील,या कोरोनाच्या महामारीत राज्यपालांना राज्यातल्या जनतेची कोणत्याही प्रकारची चिंता नाही अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.  कोव्हिड महामारीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात महाराष्ट्र सरकार आणि जनतेला प्रयत्नांची शर्थ करावी लागली आहे. राज्यात नाजूक स्थितीत असलेली आरोग्य व्यवस्था राज्यपालांनी दिलेल्या अनाठायी सल्ल्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवावी लागेल. असा घातक सल्ला देत असतानाच राज्यपाल महोदयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता या पायाभूत तत्त्वाची अवहेलना केली आहे. त्या संविधानाची शपथ घेऊनच आपण हे संविधानिक पदग्रहण केले आहे, यांचा त्यांना सोयिस्कर विसर पडलेला दिसतो. हा सल्ला जनतेच्या भल्यासाठी नसून त्यामागे खोडसाळ राजकीय उद्दिष्ट आहे, हे स्पष्ट आहे. असा सल्ला आणि त्यासाठी वापरलेली अशोभनीय भाषा राज्यपाल पदाचे अवमूल्यन करणारी आहे. राज्यपाल महोदय राज्याच्या राजकारणात नसता हस्तक्षेप करू लागले आहेत, याविषयी संशयाला जागाही राहिलेली नाही. जणू काही ठरल्यानुसार याच मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरला आहे. ही सरळसरळ जनतेच्या एका विभागाला दिलेली चिथावणी असून महामारीच्या काळात आवश्यक असलेली नियंत्रणे आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था उधळणारे कृत्य आहे. विद्यमान राज्यपाल महोदय हे राज्याच्या आरोग्याला हानिकारक बनले आहेत, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांना नाईलाजाने म्हणावे लागत आहे. आपल्यावर सोपवण्यात आलेली संविधानिक जबाबदारी पार पाडण्यास मा. कोशियारी असमर्थ असल्याचे त्यांनी स्वत:च दाखवून दिले आहे. त्यामुळे मा. राष्ट्रपतींनी विद्यमान राज्यपाल महोदयांनी संविधानाचा आणखी जास्त उपमर्द करण्यापूर्वी त्यांना त्या जबाबदारीतून त्वरीत मुक्त करावे, अशी मागणी जयदीप कवाडे यांनी आहे. आपल्या अशोभनीय राजकीय हस्तक्षेपामुळे आपल्या राष्ट्रपतींवर राज्यपालांनी दुर्धर प्रसंग आणला आहे, हे आपल्या थोर देशाचे दुर्दैव आहे. राज्यपाल महोदयांना चंबूगबाळ आवरून त्या पदावरून निरोपाचा विडा देण्यास हे कारण पुरेसे आहे. मा. राष्ट्रपतींनी संविधानाची अवहेलना थांबवण्यासाठी राज्यपाल महोदयांना त्वरित पायउतार करावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.