चंद्रपूरकरांना २०० युनिट विज मोफत द्या

248

राज्यपालांकडे आ. जोरगेवारांनी केली मागणी

विदर्भ वतन / चंद्रपुर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर दौर्यावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेकडे केली. चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. कोळशापासून वीज निर्मिती केली जात असल्यामुळे कोळशापासून हवेत उडत असलेल्या कोळशाच्या कणांपासून जिल्ह्यातील नागरिकांना अनेक प्रकारचे आजार जडलेले आहेत. मात्र,  जिल्ह्याला या वीज निर्मिती केंद्रापासून काहीच सवलती देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे सतत जिल्ह्याची उपेक्षा होत आलेली आहे. तेव्हा आम्हाला २०० युनिटपर्यंत घरगुती वीज मोफत देण्यात यावे अशी मागणी आ. जोरगेवार यांनी राज्यपालांना केली.
शिवाय चंद्रपुर जिल्ह्याला वीज उत्पादक जिल्हा म्हणून विशेष दर्जा मिळण्यासाठी आ. जोरगेवारांचे आधिपासूनचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रत्येक पातळीवर या मागणीचा ते पाठपुरावा देखील करत आलेले आहेत. याविषयावर राज्यपालांसोबत झालेल्या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. चंद्रपुर जिल्ह्याचा ४० टक्के भाग वनसंपदेने नटलेला आहे. मात्र, मानवनिर्मित प्रदुषणामुळे देशात चंद्रपुरचा प्रदुषणात प्रथम क्रमांक लागतो. येथे थर्मल पॉवर एनर्जीमुळे सर्वाधिक प्रदुषण परसत आहे. येथे राज्याच्या गरजेपेक्षा ३० ते ४० टक्के वीज अतिरिक्त निर्माण केली जाते. ही वीज ५ हजार मेगावॅट पेक्षा अधिक आहे. यासाठी लाखो टन कोळसा जाळला जातो. हा कोळसा चंद्रपुरच्या वनसंपदेतील जमिनिच्या आतील आहे. तरी सुध्दा येथील लोकांना काहीच सवलती देण्यात येत नाही अशा अनेक मुद्यांवर आ. जोरगेवार यांनी राज्यपालांशी चर्चा केली.