
विदर्भ वतन न्युज पोर्टल,नागपूर – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपुरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. २५ आणि २६ जुलै असे दोन दिवस हा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे संघर्षानंतर पहिल्यांदाच महापौर संदीप जोशी आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. पत्रकारांशी बोलताना त्यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला. उद्या आणि परवा दोन दिवस नागपूरमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत: कर्फ्यू पाळावा. २७,२८,२९ आणि ३० तारखेला लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरुन आवाहन करणार आहेत. लॉकडाउन लावणं योग्य ठरणार नाही, त्यामुळे जनतेला आवाहन करणार आहोत,” अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.
उद्या-परवा जनता कर्फ्यू असणार आहे, त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असतील, जनतेने हा कर्फ्यू पाळावा. लॉकडाउन करायची वेळ आली तर तो अत्यंत कडक असेल,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. “नागपूरमध्ये ३१ तारखेला पुन्हा बैठक घेऊन लॉकडाउनबाबत निर्णय घेणार आहोत,” असं त्यांनी सांगितलं आहे.

