वृक्षारोपण करुन ‘वन संवर्धन दिन’ साजरा 

225

दोन मित्रांचा अनोखा उपक्रम

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : २३ जुलै हा वन संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कवी, वृक्ष तथा पक्षीप्रेमी पोलिस नायक सुमित राठोड यांनी १० वृक्षरोपण करून हा दिवस साजरा केला. सोबतच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीच्या औचित्ताने शाम उज्जैनकर, सौरभ तेलतुंबडे आणि सुमित राठोड यांनी सहा वृक्षारोपण करून या देशभक्तांना आदरांजली अर्पीत केली.
सुमित राठोड यांचे बंधू सत्यशोधक सेवा संस्थेचे अध्यक्ष अविनाश राठोड आणि मुंबई येथे हॉस्पीटलमध्ये रूग्णसेवेत असलेली परिचारीका लहान बहिन पुजा राठोड यांचा सुध्दा आज वाढदिवस असल्यामुळे सुमित यांना २३ जुलै हा दिवस वृक्ष लागवडीसाठी पर्वणीच ठरला. मोठे भाऊ आणि लहान बहिनींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दोन वृक्ष लागवड करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माहुर्ली येथील पक्षी आणि वृक्षप्रेमी अशी ओळख असलेले निखील चव्हाण यांनी या पर्यावरण संवर्धन तसेच स्वातंत्र्य संग्राम गाजविणार्या महान क्रांतीकारकांंच्या जयंती दिनानिमित्त स्वखर्चाने ५० सिडबॉलची लागवड केली.
गत तीन वर्षांपासून सुमित आणि निखील हे जीवलग मित्र असे पर्यावरणपुरक एकहाती अभियान राबवित आलेले आहेत. आप्तेष्टांचे जन्मदिन, परीक्षा उत्तीर्ण, नोकरी निवड, पदोन्नती, लग्नाचे वाढदिवस, राष्ट्रीय दिन विशेष, थोर पुरूषांची जयंती-पुण्यतिथी अशा प्रसंगांना हे दोन्ही मित्र वृक्षारोपण व पक्ष्यांसाठी अन्न-पाणपोई लावून शुभेच्छा देण्याचा अनोखा उपक्रम राबवित आलेले आहेत. र्हास होत चाललेल्या निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे सुमित आणि निखील यांनी सांगीतले. तरूणाईने सुध्दा असे पर्यावरणपुरक उपक्रम कोणत्या ना कोणत्या प्रसंगी राबवावे असे आवाहन करून ‘वृक्ष लावा भविष्य वाचवा ’ हा संदेश त्यांनी दिला. सुमित राठोड हे राज्य राखीव पोलीस बल गट क्र ०४ नागपूर येथे कार्यरत आहेत.