वीज बिलाविरोधात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

223

विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्र्रमक

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यानचे संपूर्ण विदर्भातील वीज बिल माफ करण्यात यावे या मागणीसाठी लढा देत असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवार दिनांक २० रोजी विधानसभा परिसरात मुख्यमंत्र्यांसह ऊर्जामंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला.
लॉकडाऊनमध्ये वीज ग्राहकांना महावितरणाकडून प्रमाणापेक्षा अधिकचे बिल पाठविण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. यापुर्वी अनेक संघटनांनी महावितरण आणि राज्य सरकारला निवेदने दिली पण महावितरणातील अधिकार्यांकडून मागणी करण्यात आलेले वीज बिल बरोबर असल्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी, नागपूर विभागाचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात शहरातील काही ठिकाणी मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्याचे पुतळे दहन करण्यात आले. २३ मार्च पासून लॉकडाऊन लादण्यात आल्याने सर्वजण घरीच होते. सर्वांचे रोजगार, व्यापार, उद्योगधंदे बंद झाले. या तीन महिन्यात कोणाच्याच हाताला रोजगार नव्हता. जवळ असलेले सर्व पैसे तीन महिने घरखर्चात गेले. त्यामुळे आता कोणाजवळच पैसा शिल्लक राहिला नाही. आॅड ईव्हनमुळे व्यवसायाला फटका बसत आहे. एप्रिल महिन्यापासून वीज बिलात वाढ करण्याचे षड्यंत्र रचल्या गेले. आता वाढीव दरच नाही तर विदर्भातील जनतेची लॉकडाऊन काळातील सरसकट वीज बिलातुन सुटका करण्यात यावी असे मुकेश मासुरकर यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले.
वीज बिलातुन मुक्तता देण्यात आली नाही तर पुतळे दहनाच्या पलीकडे जाऊन आंदोलन करण्यात येईल तसेच महावितरणच्या अधिकारी-कर्मचार्याला घरापुढे येवू देणार नाही अशी भूमिका मासुरकर यांनी मांडली. नागरिकांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या.