Home Breaking News … अहवाल निगेटिव्ह होते, तर एक दगावला कसा?

… अहवाल निगेटिव्ह होते, तर एक दगावला कसा?

72 views
0

माजी आमदार सुधिर पारवे यांचा संतप्त सवाल

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : कुही तालुक्यात काल ७ कोरोना संशयीत रूग्ण आढळले. या सातही जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली मात्र, हाच अहवाल पुन्हा निगेटिव्ह दाखविल्याने आरोग्य यंत्रणेने तालुक्यातील जनतेचा खेळखंडोबा मांडला की काय अशा शब्दात उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी आरोग्य यंत्रनेवर सडकुन टिका केली. एकाच स्पॅमचे दोन वेगवेगळे अहवाल देणार्या यंत्रणेला दोषी धरून त्यांचेवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून चालविलेल्या पॉझिटीव्ह-निगेटीव्हच्या लपंडावात आता या सातपैकी  एक व्यक्ती मरण पावल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच पोल खुलली यावर प्रशासनाचे काय उत्तर आहे, असा संतप्त सवाल पारवे यांनी केला.
कुही तालुक्यातील रूयाड गावातील एक, वेलतुर येथील एक, चितापुर-३ आणि कुही शहरात दोन असे एकाच दिवशी सात जण कोरोना संशयीत आढळले. त्यांना कोरंटाईन करून अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला. दुपारी १२ च्या दरम्यान मिळालेल्या अहवालात ते सातही पॉझिटीव्ह असल्याचे दाखविले. ग्रामीण भागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या संख्येने रूग्ण आढल्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने हे सर्व परिसर सील करण्यात आले. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सायंकाळी कुहीला भेट दिली त्यावेळी माजी आमदार सुधीर पारवे यांनी व्यवस्थेसंबंधी त्यांचेशी चर्चा देखील केली. मात्र, हाच नमुना पुन्हा तपासल्यानंतर निगेटिव्ह दाखविल्याने तालुक्यात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. सील करण्यात आलेले परिसर शिथील करण्याची प्रक्रिया आता आरंभ होणार होती.
या घटनाक्रमाला एक दिवसाचा कालावधी सुध्दा उलटला नाही तोच या सात पैकी एक रूग्ण दगावल्याने काय म्हणावे अशा कुचकामी यंत्रणेला? या प्रकारामुळे संतापलेल्या पारवे यांनी पालकमंत्र्यासह, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची कानउघाडणी केली. देशात सतत कोरोनाचे रूग्ण वाढत आहे, दिवसेंदिवस रूग्णसंख्येचा एक नवा विक्रम गाठल्या जात आहे. अशात जर तपासण्या योग्य पध्दतीने होत नसतील तर मृतांची संख्या देखील वाढण्यास वेळ लागणार नाही. सध्या कुहीत जो प्रकार सुरू आहे ते याचाच एक नमुना होय. तसेच एकाच स्पॅमचा पॉझिटीव्ह आणि नंतर निगेटिव्ह असे दोन वेगवेगळे अहवाल कसे? आणि मग निगेटिव्ह अहवाल हा अंतिम अहवाल होता तर त्यातील एक दगावलाच कसा? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या जनतेला आपल्या जीवाची पर्वा आहे, अशा प्रसंगी आरोग्य यंत्रणेने पॉझिटीव्ह – निगेटीव्हचा खेळखंडोबा मांडून लोकांच्या रोषाला एकप्रकारे चिथावणी दिली असल्याच्या भावना देखील पारवे यांनी साप्ताहिक विदर्भ वतन आणि न्युज पोर्टलशी बोलतांना व्यक्त केल्या. पालकमंत्र्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून चाचणी करणारी यंत्रणा कुचकामी ठरत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा असाही संतप्त सवाल करत आरोग्य यंत्रणेतील अशा झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पारवे यांनी केली. एका युवतीचे लग्न जुळत आले होते, प्रशासनाने चालविलेल्या या लपंडावामुळे तीच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला असल्याच्या घटनेकडे माजी आमदार सुधीर पारवे यांनी हळहळून लक्ष वेधले.