आ. जोरगेवार यांनी ऊर्जा मंत्री तनपुरेंना केली वीज बिल माफ करण्याची मागणी 

233
विदर्भ वतन / चंद्रपूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले ऊर्जा मंत्री तनपुरे यांना लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांनी केली. चंद्रपूर शासकीय विश्राम गृहात सविस्तर भेटीदरम्यान आ. जोरगेवार यांनी अनेक मुद्यांवर लक्ष वेधत जनसामान्यांच्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या.
 वीज उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित जवळपास पाच हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीज निर्मिती केली जाते. त्यातुन निर्माण होणार्या प्रदूषणाचाही दुष्पपरिणाम चंद्रपूरकरांनाच सोसावा लागतो. कोळशावर आधारीत विद्युत केंद्र येथे असल्याने येथील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषणामुळे  जिल्हयातील नागरिकांचे वयोमान कमी झाले असून दमा, फुफ्फुसरोग, श्वसनाचे आजार तसेच तत्संबंधी विविध प्रकारचे आजार जडले आहे. या विद्युत केंद्राचे दुष्पपरिणाम आम्हाला भोगावे लागत असून आमची वीज आम्हालाच महाग विकल्या जाणे हा आमच्यावर होत असलेला अन्याय आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २००  युनिट वीज मोफत देण्यात यावी, लॉकडाऊन काळात नागरिकांना देण्यात आलेले तीन महिन्याचे वीज बिल प्रमाणाबाहेर आकारण्यात आल्यामुळे त्यासंबंधी तक्रारींचा पाऊस पडला आहे त्यामूळे संपूर्ण विज बिलाची पुन्हा तपासणी करण्यात यावी अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी उर्जा मंत्र्यांना यावेळी केली.
यंग चांदा ब्रिगेडचेही निवेदन
प्रमाणापेक्षा जास्तीचे वीज बिलाविरोधात जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असताना हे बिल तत्काळ रद्द करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन यंग चांदा बिग्रेडच्या महिला शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, वार्ड संघटिका चंदा वैरागडे, स्मीता वैद्य, वैशाली रामटेके, विमलताई कातकर, भाग्यश्री हांडे, दुर्गा वैरागडे यांनी उर्जा मंत्र्यांना दिले.