
विदर्भ वतन / नागपूर : गत पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल मौन सोडत शहरात हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. नक्षत्रानुसार शहरात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. रामेश्वरी, शताब्दी चौकात धुआधार पाऊस तर मानेवाडा चौक कोरडा असे कालचे चित्र होते. तसेच एखाद्या ठिकाणी ढगाळ वातावरण तर कुठे उन अशी परिस्थीती अनुभवण्यात आली. आज सकाळपासुनच आकाशात ढग दाटल्याने शहरातील काही भागात पाऊस आल्याची माहिती आहे. मात्र अजुनही पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला नाही. त्यामुळे घरोघरी अद्यापही पंखे, कुलर सुरूच आहेत. एकंदरीत शहरातील नाले ओसंडून वाहतील अशी परिस्थीती आजतरी नाही. काल दिवसभरात आणि काही प्रमाणात रात्री झालेल्या पावसामुळे वातावरणातील उष्णता काहीसा कमी झालेला जाणवला.
विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतांमधील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकर्यांना पेरणीपासुन तर सध्या सुरू असलेल्या डवरणीपर्यंत पावसाने चांगलीच सवड दिली आहे. त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदाचा पाऊस सध्यातरी पिकांसाठी मोठा फायदेशीर ठरल्याचे दिसून येते. तसेच शहरात पिण्यासाठी लागणारा जलाशयातील पाणीसाठीसुध्दा पुरेसा जमा झाला आहे. गत वर्षीचा विचार केल्यास पाऊस तब्बल एक महिना उशिराने आला होता. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. मात्र, यंदा अगदी ठरलेल्या वेळेनुसार पाऊस पडल्याने शेतकर्यांनी देखील पेरण्या आटोपून घेतल्या. परिणामी शेतात पिकांनी आपली चांगलीच उंची गाठली आहे. पंधरा दिवस दडी मारल्यामुळे आता संततधार पाऊस जरी आला तरी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता फारच नगण्य राहू शकते. अद्याप जमिनीची दाहकता कमी करण्याइतपत पाऊस पडला नसल्याने येत्या काळात रोगराई वाढण्यास वेळ लागणार नाही.

