Home Breaking News मानधन दिले नसल्याने आशा वर्कर्सचा कामावर बहिष्कार

मानधन दिले नसल्याने आशा वर्कर्सचा कामावर बहिष्कार

167 views
0
विदर्भ वतन / नागपूर : कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर्सची भुमिका बजावणार्या आशा वर्कर्सना सर्व्हेसाठीे २०० रूपये प्रतिदिवस मोबदला देण्याचे निश्चित केल्यानंतर शब्द फिरविण्यार्या प्रशासनाविरोधात आशा वर्कर्सनी आपले काम बंद करून आंदोलन सुरू केले. गत चार महिन्यांपासून या आशा वर्कर्स कोरोना सर्व्हेचे काम करत आहेत. आता ‘पैसा नाही म्हणून देऊ शकत नाही’ अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
अल्प मोबदल्यात काम करणार्या आशांकडून जणूकाही विनामोबदला काम करून घेण्यात येत असल्याचे या विधानावरून दिसून येते, त्यामुळे सिटूमध्ये संतापाची लाट पसरली असुन आंदोलनातून कोरोना कामावर बहिष्कार टाकण्यात आला. शेकडो आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे हातात फलक घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबतच सर्व आरोग्य केंद्रांसमोर सुध्दा आंदोलन करण्यात आले. मनपाच्या राखीव निधीतुन कामाचा मोबदला देण्यात यावा, कोरोना सर्व्हेचे २०० रूपये रोज मिळाले पाहिजे, एपीएल-बीपीएल अट रद्द करून सरसकट ३०० रूपये देण्यात यावे, आशा वर्कर्सना सन्मानजनक वागणूक दिली जावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर जिल्हा कमिटीचे राजेंद्र साठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.  प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, मनीषा वारस्कर, अंजू चोपडे, कल्पना हटवार, मंदा गंधारे, पौर्णिमा पाटील, रूपलता बोंबले, नंदा लिखार तसेच जिल्हा सदस्य व शेकडो आशा वर्कर्स यावेळी उपस्थित होत्या.