रूग्णालयाकडून आयसोलेटेड रूग्णांची उपासमार

178
विदर्भ वतन / वर्धा : पिपरी मेघे येथील आयसोलेशन करण्यात आलेल्या दोन बालकांसह १६ जणांना सकाळपासून उपवाशी ठेवण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. ओरड केल्यानंतर दुपारनंतर फक्त चहा आणि बिस्कीटे देऊन त्यांची बोळवण करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील अधिकारी गत अनेक वर्षांपासून या जागेवर असल्याने रूग्णालयातील प्रशासकीय वातावरण दुषीत होत चालले आहे. मागील आठवड्यात आयसोलेशन वार्डातील रूग्ण रात्रीच्या सुमारास फिरून परत हॉस्पीटलमध्ये येत असल्याचा प्रकार ताजाच असताना देखरेखीत ठेवण्यात आलेल्या रूग्णांना उपवाशी ठेवण्याच्या प्रकाराने या रूग्णालयाच्या प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. कोरोनाच्या सुरूवातील या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांना पीपीई किट न देण्याचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. तर याच काळात हैद्राबाद येथील आयसोलेट झालेल्या युवकाला जेवणात पाण्यासारखे वरण वाढण्यात आले होते. अशा अनेक प्रकारामुळे हे रूग्णालय सतत चर्चेत राहिले आहे. पिपरी मेघे येथील १६ जणांना दुपारी १ वाजता रूग्णालयात आणण्यात आले. त्यांची नोंदणी झाली नसल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले.