विदर्भ वतन / वर्धा: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या १३ ग्रामपंचायतमध्ये रात्री ८ वाजल्यापासून पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिले आहेत. केवळ औषधी दुकाने, दवाखाने, जीवनावश्यक वस्तुची दुकाने, शासकीय कार्यालय चालू राहतील.
वर्धा शहराला लागून असलेल्या पिपरी मेघे येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्ती कोरोना बाधित निघाल्या आहेत. आणखी रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता उपविभागीय अधिकारी यांनी तीन दिवस, दिनांक १० जुलैच्या रात्री ८ वाजता पासून दिनांक १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या १३ ग्रामपंचायती सावंगी मेघे, पीपरी मेघे, उमरी मेघे, सिंदी मेघे, बोरगाव, मसाळा, सातोडा, नालवाडी, नटाळा या ग्रामपंचायतीमध्ये संचारबंदी लागू राहील. या काळात नागरिकांनी घरी राहावे असे आवाहन त्यांनी केले.

