सुमित राठोड महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे मानकरी

227
विदर्भ वतन / वाशिम-मानोरा : राज्य राखीव पोलिस दलातील सुमित राठोड यांना ज्ळगाव येथील सेवक सेवाभावी संस्थेतर्फे दिला जाणार ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहिर झाला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. अशा वेळी सुमित राठोड यांनी मानवतेसाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सुमित राठोड हे मुळ माहुर्ली या गावातील रहिवासी आहेत. सध्या ते नागपुरात राज्य राखीव पोलिस बल गट क्र.०४ या राखीव बटालीयन मध्ये सेवारत आहेत. संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना या आजाराच्या संकटामुळे प्रत्येकाचा जीव वाचावा यासाठी पोलिस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, रूग्णवाहिका चालक, मेडिकलची चमु, महावितरण, पत्रकार तसेच अन्य सामाजिक संस्था आपआपल्या परिने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना अनेकांनी आपला जीव सुध्दा गमावला आहे. दिनांक २५ मार्च ते ३१ मे २०२० या कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता मानवतेसाठी झटत राहिलेल्या व्यक्ती आणि संस्थांना ‘सेवक सेवाभावी संस्था, जळगाव’ तर्फे ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानीत केले जात आहे. हा पुरस्कार जाहिर करताना काही निकष लावण्यात आले होते त्या आधारावर सुमित राठोड हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
सुमित राठोड हे कवी मनाचे असून कोरोना काळात त्यांनी रचलेल्या ‘रक्षक’ या कवितेला औरंगाबाद येथील शब्दगंध समुह प्रकाशनतर्फे प्रथम क्रमांकाने पुरस्कृत करण्यात आले. तसेच जळगाव स्थीत अहिल्याबाई होळकर संस्थेकडून त्यांना आदर्श कवी, लेखकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. नक्षलग्रस्त भामरागड येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी आपले पक्षी आणि वृक्षप्रेमसुध्दा जोपासले आहे. शिवाय अनेक सामाजीक कामात ते अग्रेसर असतात उन्हाळ्यात नागपुर कॅम्प परिसरात पक्षांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करून त्यांनी आपल्या नोकरीकाळातले आठवे वर्ष साजरे केले होते.
प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भविष्यातही माझे हे कार्य सतत सुरू राहिल असे आपले मनोगत व्यक्त करताना सुमित राठोड म्हणाले.