
अत्यावश्यक सेवेला वेळेचे निर्बंध नाही
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन /गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोन वगळून इतर ठिकाणी सर्व मार्केट व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील. तर सर्व दवाखाणे, औषध विक्रीची दुकाने, औषधी सेवेशी संबंधित आस्थापना तसेच पेट्रोल पंप, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ संकलन व विक्री केंद्र, औषधे व खाद्यपदार्थ यांच्या घरपोच सुविधेसाठी वेळेचे निर्बंध लागू राहणार नाही. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिनांक १० जुलै रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, राज्यसरकारने दोन दिवसापुर्वीच सायकांळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली, असे असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र सायकांळ ६ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. आता ३१ जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याच अनुषंगाने राज्य शासनाने नव्याने मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत. त्याअनुषंगाने हे आदेश काढण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी या वेळेप्रमाणे निश्चित केला आहे. अत्यावश्यक सेवांना या आदेशातुन वगळण्यात आले आहे. दरम्यान कुठेही गर्दी झाल्याचे दिसून आल्यास अथवा सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास तसेच शासनाने कोविड-१९ चा संसर्ग होणार नाही याबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकाने किंवा आस्थापना तात्काळ बंद करण्यात येतील. असे नुकत्याच जाहिर करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

