उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक

260

विदर्भ वतन न्युज पोर्टल – उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी पकडताच विकास दुबे ‘मी कानपूरचा विकास दुबे’ आहे असं ओरडत होता. विकास दुबे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विकास दुबे हरियाणामधून कसा पळाला याची माहिती अद्याप उघड झालेलं नाही. एएनआयने विकास दुबेच्या अटकेचा व्हिडीओ ट्विट केला असून यामध्ये त्याने टी-शर्ट घातलेलं दिसत आहे. मंदिरात जाण्याआधी त्याने पुजेचं सामान विकत घेतलं होतं. यावेळी दुकानदाराने त्याला ओळखलं आणि सुरक्षा रक्षकांना सांगितलं. विकास दुबे बाहेर आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला विचारणा केली.

यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि पोलिसांनी विकास दुबेला अटक केली. विकास दुबे याची सुरक्षा रक्षकांसोबत बाचाबाची तसंच हाणामारीदेखील झाली. यानंतर त्याला पोलिसांकडे सोपवण्यात आलं. विकास दुबेच्या अटकेच्या व्हिडीओत पोलीस कर्मचाऱ्याने त्याला व्हॅनच्या सहाय्याने पकडून ठेवल्याचं दिसत आहे. यावेळी तो मी विकास दुबे आहे असं ओरडताच पोलीस कर्मचारी त्याच्या कानाखाली लावतो.