सारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार-अजित पवार

291

विदर्भ वतन न्युज पोर्टल – काही दिवसांपासून राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थळी असलेल्या सारथी संदर्भात राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज याविषयी बैठकी झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पवार म्हणाले की, ‘सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. यासोबत उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.

राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरु केलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत बसण्यावरुन सकाळी वाद झाला होता. मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरून या संस्थेची चर्चा सुरू होती. यावरून मराठा क्रांती मोर्चाकडून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. यानंतर हा वाद वाढला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आज चर्चा झाली यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.