दमा, अस्थमा, शुगर असलेल्या महिला सफाई कर्मचार्याचंी कोविड वार्डात नेमणूक

266

सफाई कर्मचार्यांच्या जीवावर उठले मेडिकल प्रशासन

विदर्भ वतन / नागपूर : मेडिकल रूग्णालय कार्यालयाकडून दमा, अस्थमा, शुगर असलेल्या ४० वर्षीय महिलेची कोविड वार्डात नेमणूक केल्याने मेडिकल प्रशासन सफाई कर्मचार्यांच्या जीवावर उठल्याचा प्रकार सामोर आला आहे. संगिता चुटेले असे त्या महिलेचे नाव असून तीला सोमवार दिनांक २२ जून पासून कोविड वार्डात पाठविण्यात आले.
सफाई कर्मचार्यांकडून साफसफाईची कामे केली जातात. मात्र, कोविड वार्ड अतिदक्षततेत मोडल्या जाते. आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असलेल्यांना कर्मचार्यांनाच कोविड वार्डातील सेवा देण्याकरिता नेमल्या जाते. मात्र हा नियम आरोग्य कर्मचार्यांसाठी लागू होत नसल्याचे या भेदभावपूर्ण प्रकारावरून दिसून येते.  कोविड वार्डात ज्यांची प्रकृती उत्तम आहे अशा कर्मचार्यांची साधारणत: ७ किंवा १५ दिवसांकरिता नेमणूक केली जाते. मात्र दमा, अस्थमा आणि शुगर असलेल्या या महिला सफाई कर्मचार्याची स्वच्छता निरिक्षक रूग्णालय कार्यालयाकडून नेमणूक करण्यात आली. कर्मचारी महिलेने या आजारासंबंधी स्वत: उपचार घेत असलेली कागदपत्रांची फाईल सुध्दा वरिष्ठांना दाखविली पण तीचे एक सुध्दा ऐकूण घेण्यात आले नाही. यावर मेडिकल प्रशासनाकडून कुठलीही तपासणी न करता तुमचे आरोग्य उत्तम आहे, असे बजावून कोविड वार्डात साफसफाई करण्याचे फर्माण सोडण्यात आले. या प्रकारामुळे अन्य सफाई कर्मचारी धास्तावले असून मेडिकल प्रशासनाविरूध्द संतापाची लाट पसरली आहे.