राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन /गोंदिया: जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथे आंघोळीसाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. हि घटना २५ जून सकाळी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दिशांत मनोज गौतम (वय १४) आणि दीपक सुनील गौतम (वय १२) अशी मृतांची नावे आहेत.
लॉकडाऊनमुळे सध्या शाळेला सुटी आहे. त्यामुळे दिशांत आणि दीपक हे बुधवारी सकाळी गावाशेजारी असलेल्या नाल्यात आंघोळीकरिता गेले. सोनेगाव आणि डबेटोला मार्गावर असलेल्या नाल्यात बाराही महिने पाणी भरलेला असते. हे दोघेही पाण्यात आंघोळीला उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यांनी आरडाओरड केली, दरम्यान परिसरात गुरे चारत असलेले आणि शेतात काम करत असलेल्या नागरिकांनी नाल्याकडे धाव घेत शोधाशोध केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि यावेळेत दोघांचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दीपक इयत्ता नववीत आदर्श विद्यालय गोंडमोहाडी येथे, तर दीपक गौतम इयत्ता सातवीत जिल्हा परिषद शाळा सोनेगाव येथे शिकत होता. एकाच कुटुंबातील दोघे भाऊ या घटनेत मरण पावल्यामुळे गौतम कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली. तिरोडा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

