Home Breaking News स्वच्छता कर्मचारी आरोग्य सुविधेविना

स्वच्छता कर्मचारी आरोग्य सुविधेविना

0
स्वच्छता कर्मचारी आरोग्य सुविधेविना
विदर्भ वतन / नागपूर : मेडिकलमधील अधिष्ठाता कार्यालया अंतर्गत आज घडील ४४ स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. पावसाळा सुरू झाला आहे या हंगामात पावसामुळे उद्भवणार्या आजारांपासून रक्षण व्हावे यासाठी हातमोजे, मास्क आणि अन्य किट देण्यात येतात मात्र, सुरक्षेची यातील कोणतीही सामुग्री अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे आहे त्याच अवस्थेत या स्वच्छता कर्मचार्यांना आपले काम करावे लागत आहे. या प्रकारामुळे या कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे मेडिकल प्रशासन डोळे झाक करीत आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे मेडिकलमध्ये कर्मचार्यांची कमतरता आहे आणि या इमारतीत तसेच परिसरात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व आहे. आजाराचा फैलाव होण्यासाठी तसेच त्याची रोकथाम करण्यासाठी देखील स्वच्छतेला महत्व आहे. या कामासाठी अधिष्ठाता कार्यालयात ४४ स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना येथे असलेली सर्व डिपार्टमेंट, १० होस्टेल, जीमखाना, बॅडमिंटन हॉल, परेड ग्राउंड, स्वीमिंग पुल, ई-लायब्रेरी, प्रयोगशाळा, पेडियाट्रीक, फिजीकल आणि अन्य थेरेपी या ठिकाणातील स्वच्छता करण्याचे काम बाय आॅर्डर सोपविण्यात आले आहे. त्याकरिता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे किट देणे गरजेचे ठरते. मात्र या कामात मेडिकल प्रशासन अपवाद ठरताना दिसत आहे.  दहा होस्टेलच्या साफसफाईसाठी प्रत्येकी एक होस्टेलमागे नियमानुसार तीन कर्मचारी देण्यात आले होते पण, कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे कोरोनासाठी या होस्टेलमधील तीन पैकी एक कर्मचारी काढून घेण्यात आला. आता एक होस्टेलची सफाई दोन कर्मचार्यांच्या खांद्यावर आली आहे. या कर्मचार्यांना आहे तेवढ्यच पगारावर आता चौकीदारी, पाणी पुरविणे तसेच बाबुगिरीचे कामे सांगण्यात येत आहेत.
याव्यतिरिक्त अन्य वीस कर्मचारी विविध कामांसाठी कार्यरत आहेत या विस पैकी ३ कर्मचारी हमालीच्या कामांसाठी रूजू करण्यात आले आहे पण त्यांना कधीच हमालीची कामे सांगण्यात आली नाही. या कामासाठी स्वच्छता निरीक्षकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वच्छता कर्मचार्यांना बोलाविण्याचे फर्माण सोडल्या जाते. या कर्मचार्यांना त्याचे मुळ काम सोडून हमालीची कामे करण्यासाठी यावे लागते कोणी नकार दिलाच तर त्याचा रेकॉर्ड खराब करण्याची धमकी देण्यात येते. काही दिवसांपूर्वी औषध आणि अन्य सामग्रीचे खोके भरलेली दोन ट्रक सामान येथे आणण्यात आले होते. या दोन्ही ट्रकमधील सामग्री स्वच्छता कामगारांकडून उतरविण्यात आली होती. मग येथे वेतन घेऊन काम करणारे हमाल नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हापासून या कामगारांना हमालीच्या कामात सारखे गुंतविल्या जात आहे या प्रकारामुळे अधिष्ठाता प्रशासनाविरोधात स्वच्छता प्रशासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

पीडब्लूडीला पगारी विश्रांती !

मेडिकल परिसरात अनेक मोठमोठ्या इमारती आहेत. त्याची देखभाल दुरूस्ती, नाले सफाई, फुटलेली नळाची दुरूस्ती, खराब नळ बदलविणे, परिसरातील झाडांवर फरावणी करणे, कचरा कापणे अशी अन्य प्रकारची कामे करण्यासाठी येथे पीडब्लूडीची दोन कार्यालय कार्यरत आहेत. आता या कामासाठी हा स्वतंत्र विभाग असतानाही स्वच्छता कर्मचार्यांकडून ही कामे करून घेतल्या जात असल्याचे नवल वाटते. या संतापजनक प्रकारामुळे मेडिकलचे प्रशासन करते तरी काय? कोणत्या विभागाची कोणती कामे आहेत हे सुध्दा या प्रशासनाला कळते की नाही? असा प्रश्न पडतो. या प्रकारामुळे एकंदरीतच असे लक्षात येते की, निम्न श्रेणीतील या कामगारांना हवे तसे आणि मनात येईल तेव्हा राबवून घेण्याचे धोरण मेडिकल राबवित आहे. मग पीडब्लूडीच्या अख्त्यारीतील कामे देखील आम्हालाच करायची असतील आणि पीडब्लूडीच्या अधिकारी-कर्मचार्यांना जावईबापूसारखे घरजावई बनवून त्यांचे लाड सरकारी पगारावर पुरवायचे असेल तर मग हा कोरोनाच्या नावावर अतिरिक्त कामे सोपविण्याचा दिखावा उगाच कशाला करायचा? असा सवाल स्वच्छता कर्मचार्यांनी केला.

सामुग्री जाते तरी कुठे ?

आरोग्य सुरक्षीततेच्या दृष्टीने स्वच्छता कर्मचार्यांना गमबुट, हॅण्डग्लोज, मास्क, रेनकोट, सॅनिटायझर अशी अन्य वस्तू दिशानिर्देशांप्रमाणे देण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात या वस्तू कोणालाच देण्यात आल्या नाहीत. उलट स्टोअर इंचार्ज डॉ. कांचन वानखेडे यांच्या स्टोअरमध्ये असे प्रचंड साहित्य दडवून ठेवलेले आहे. तेथे काम करणारे स्वच्छता कर्मचारी रोज हे साहित्य मिळावे यासाठी मागणी करतात. त्याच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याउलट येथे कार्यरत असलेले सर्वच डॉक्टर्स कुठेना कुठे जॉब करतात, कुणाचे हॉस्पीटल देखील आहे, कुणाचे लॅबही आहेत. सामान्य रूग्ण मेडिकलमध्ये गेला तर सर्वांनाच बाहेरून औषधे आणि अन्य सामग्री आणण्यासाठी फर्माविले जाते. मात्र, स्टोअर रूममध्ये असलेले साहित्य-औषधे नेमकी जातात तरी कुठे? असा प्रश्न पडतो. निदान येथे कार्यरत स्वच्छता कर्मचार्यांना तरी सुरक्षेसंबंधी सामग्री उपलब्ध करून देण्याची बुध्दी स्टोअर इंचार्ज वानखेडेला सुचेल काय? मेडिकलचे प्रशासन योग्य प्रकारे चालावे यासाठी अधिष्ठात्यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, ते सतत आॅपरेशन थियेटरमध्येच रमलेले असल्यामुळे अन्य अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येते. अशा एैतखोर अधिकार्यांमुळेच आशिया खंडातील सर्वात मोठे हॉस्पीटल मानल्या जाणार्या मेडिकलच्या प्रशासनाला गालबोट लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here