येत्या ८-१० दिवसात रिझल्ट पहायला मिळेल : ना.सुनिल केदार

152

नाभिक व्यावसायीकांनी मांडल्या व्यथा

विदर्भ वतन / नागपूर : सलुन दुकाने सुरू देण्यात यावी यासाठी शनिवार दिनांक २० रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात नाभिक व्यावसायीकांनी ना. सुनिल केदार यांचे समक्ष मागणी केली. यावर विविध पैलूंवर लक्ष वेधत ना. केदार यांनी येत्या ८-१० दिवसात रिझल्ट पहायला मिळेल असे सुतोवाच केले. यावेळी मंचकावर कॉंगे्रसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि जि.प. अध्यक्षा बर्वे उपस्थित होत्या.
मार्च महिन्यांपासून लाकडाऊनचे सत्र सुरू करण्यात आले. पाचव्या लॉकडाऊनमध्ये जवळपास सर्वच व्यावसायीकांना आपली प्रतिष्ठाने सुरू करू देण्याच्या मुभा देण्यात आल्या मात्र, नाभिक व्यावसायीकांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे या व्यावसायीकांच्या संघटनांनी विविध पातळीवरून मुख्यमंत्र्यांना दुकाने सुरू करू देण्याची मागणी केली होती. दुकाने सुरू नसल्यामुळे आर्थिक मिळकत झाली नाही परिणामी कुटुंबाच्या पालन पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय शासनाने देखील कोणतीही मदत केली नाही त्यामुळे राज्यात काही ठिकाणी नाभिक व्यावसायीकांनी आत्महत्या देखील केल्याच्या घटना सामोर आल्या आहेत. अनेक नाभिक व्यावसायीकांची दुकाने ही किरायाच्या जागेवर आहेत, तसेच त्यातील बरेच लोक किरायाच्या घरात राहतात. दुकाने बंद असल्यामुळे किरायाचा भरणा करता आला नाही. त्यामुळे घरमालकांनी पैशासाठी तकादा लावला आहे. अखेर पैसा आणायचा कुठून आणि कुटूंबाचा उदरभरणा करायचा की दुकान-घराचा किराया चुकता करायचा, शेवटी आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न पडतो. शासनाने आमच्या घराचा आणि दुकानाचा किराया, प्रलंबित वीज बिल माफ करावे आणि दुकान मालक तसेच त्यात काम करणारा कारागीर याला एक ठराविक आर्थीक मदत द्यावी तसेच आम्हाला दुकाने सुरू करू द्यावी अशी मागणी केली.
दुहेरी संकटात सापडलेल्या या व्यावसायीकांचे उपरोक्त मनोगत ऐकुण घेतल्यानंतर ना. केदार म्हणाले की, जीवीत हानी झाली नाही पाहिजे, कोविड-१९ या वायरसचा शहरातून गावात देखील शिरकाव झाला आहे त्यामुळे मोठी विचित्र स्थिती पाहायला मिळते. एखादे काही झाले की त्यात चांगल्या लोकांनासुध्दा भरडल्या जाते. आपला मेहनती समाज आहे शिवाय आपला जनसंपर्क देखील दांडगा असून आपण सर्वांशी सलोख्याने वागत आलेले आहात हेच आपले कौशल्य आहे. केंद्र सरकारच्या गाईड लाईन नुसार फिजिकल कॉन्टॅक्ट याचा डायरेक्ट  इनपॅक्ट इथे पडला. सरकारी, खासगी क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांचे पगार प्रभावित झाले. त्यामुळे सांगावे कुणाला.
.
राज्य शासनातर्फे बांधकाम आणि अन्य क्षेत्राला अनुदान देण्यात येणार आहे. या यादीत आपले नाव समाविष्ट करू घेऊ. शिवाय आंध्रप्रदेश आणि तेलंगणा शासनाने नाभिक व्यावसायीकांसाठी काय उपाय योजना केल्या, काय सुविधा दिल्या याची माहिती करून घेऊ आपण चंद्रपूरसारखी घटना होऊ देवू नका. स्टार्ट अप झाले आहे. कोविडच्या जगातून वाचल्यावर नव्याने सुरूवात करण्यासाठी महाराष्ट्र शासन पुढे येईल. असे ना. सुनिल केदार म्हणाले.