
जिल्ह्यात १ लाख २३ हजार नागरिकांनी केला अॅप डाऊनलोड
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन / गोंदिया (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. जरी आवश्यक असले तरी बाहेर पडतांना मास्क, दुपट्टे व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आरोग्य सेतु अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हयातील नागरिकांना केले आहे.
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर केल्यामुळे हे अॅप सर्वसामान्य नागरिकांसाठी अस्त्रासारखे काम करते. जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही, तोपर्यंत यावर मात करण्यासाठी सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. पण यालाच जोड देत शासनाने कोरोनाची माहिती देण्यासाठी, तसेच आपण कोणाला भेटतो, कुठे जातो, तिथे कोरोनाचे रुग्ण आहेत का अशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आरोग्य सेतू अॅप तयार केले आहे. परंतु नागरिकांनी सदर अॅपमध्ये खरी माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी नागरिकांना केले आहे.
हे अॅप डाऊनलोड केल्यावर सगळ्यात आधी युजरचे फोन नंबर विचारण्यात येते. त्यावर ओटीपी येतो आणि ओटीपी टाकल्यानंतर या अॅपवर रजिस्टर केले जाऊ शकते. यानंतर काही प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. तसेच युजरने गेल्या काही काळात परदेश प्रवास केला आहे का याचा इतिहास विचारला जातो.
दिलेल्या माहितीच्या आधारे या अॅपवर अनेक फिचर्स आहेत. एक अत्यंत महत्त्वाचे फीचर म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना शोधण्याचे काम केले जाते व त्याच्यावर नजर ठेवली जाते.
ब्लुटूथ आणि लोकेशन ट्रेसिंग तंत्रज्ञान वापरल्यामुळे या अॅपचे काही फायदे निश्चितच आहेत. आरोग्य सेतू या अॅपच्या माध्यमातून एखादी व्यक्ति कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर हे अॅप अलर्ट करू शकते, पण हे अॅप रजिस्ट्रेशन करताना लोकांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं आणि स्वत:ची खरी माहिती दिली असेल तरच हे शक्य होईल. ते कुठे जातात, कुणाला भेटतात, किती वेळ एका ठिकाणी थांबतात या सगळ्या गोष्टींवर प्रशासन नजर ठेवू शकतं. आरोग्यसेतू अॅप ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना त्यांच्या भाषेत ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास कामी येऊ शकते असे बलकवडे म्हणाल्या.

