अवास्तव वीज बिलाने ग्राहकांना धक्का

206
विदर्भ वतन / गोंदिया : विद्युत महामंडळाने लॉकडावून काळातील मागील ३ महिन्यांत मिटर रिडींग न घेता जून महिन्यात सरसकट बिल देताना भरमसाठ आणि  सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील वीज बिल दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला असून गोंदिया जिल्ह्यातील हे अवास्तव वीज बिल माफ करावे अशी मागणी  नानव्हा येथील सामाजिक कार्यकर्ते गौरीशंकर बिसेन यांनी केली.
मार्च महिन्यापासून कोरोना वायरसमुळे लाकडाऊन लादले गेले यामुळे सर्वसामान्य गरीब लोकांचे, लहान-मोठ्या व्यवसायिकांचे आस्थापणे बंद आहेत. कोणत्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती नसताना वीज मंडळाने मार्च, एप्रिल व मे या ३ महिन्यांचे वीज मीटर रिडींग न घेता एकत्रितपणे ३ महिन्याचे रिडींग एकत्रित करून फुगवलेल्या रकमेचे बिल दिले आहे. ही सपशेल सर्वसामान्य जनतेची फसवणूक असून यात तत्काळ सुधारणा करावी व सुधारित बिल देण्यात यावे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मध्यप्रदेश सरकारने सर्वसामान्य लोकांचे मागील ३ महिन्याचे वीज बिल माफ केले असून आपल्या राज्यातील आघाडी सरकार मात्र गरिबांच्या जीवावर उठल्याचे या अनुचित प्रकारावरून दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा मागील ३ महिन्याचे वीज बिल माफ करावे. राज्य सरकारच्या या जीवघेण्या वीज बिल निर्णयाचा निषेध करीत जनतेने एकसंघ राहून याविरोधात लढा घावा असे आवाहन गौरीशंकर बिसेन यांनी केले.