
शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे यांचा आक्षेप
विदर्भ वतन / वर्धा : इगल एक्सलंट प्लस या कंपनीचे सोयाबीन उगवलेच नसल्याने हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकर्यांची लाखो रूपयाने फसवणूक झाली. या कंपनीविरोधात शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी घुसे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांना निवेदनाव्दारे माहिती देऊन दोषी इगल एक्सलंट प्लस कंपनी आणि विक्रेता यांचेकडून शेतकर्यांची नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी केली. .
गोविंदपूर येथील शितल चौधरी या शेतकर्याने इगल एक्सलंट प्लस या कंपनीची ६५ बॅग सोयाबीन, अरूण सिड्स अॅण्ड पेस्टिसाईड्स वर्धा या विक्रेत्याकडून नगदीच्या व्यवहाराने खरेदी केली. बिलामध्ये लॉट नंबर नमुद नसल्याने हे बियाने नित्कृष्ट प्रतिचे असून त्याचा पुरवठा ही कंपनी करत असल्याचा संशय या प्रकारानंतर शेतकर्यांनी व्यक्त केला. एकूण ६० एकर जागेत या बियानाची पेरणी करण्यात आली मात्र, त्यातील एकही दाना उगवला नाही. या बोगस बियानाच्या खरेदीत शेतकर्यांना ६ लाख रूपयाचा गंडा बसला. याप्रकरणी तुषार देवढे यांनी जिल्हा कृषि अधिक्षक यांनी निवेदन देवून तक्रार केली. त्या आधारावर उपविभागीय कृषि अधिकारी एन. एन. घोडमारे, कृषि अधिकारी डढेहनकर, मंडळ कृषि अधिकारी एस. डी. सुतार, कृषि सहायक एस. डी. हातमोडे यांनी ही बियाने पेरलेल्या शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. याप्रकरणी तुषार देवढे यांनी संबंधित कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

