कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांचे आंदोलन ११ दिवसानंतरही सुरूच 

210

ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडली,रुग्णालय पडली ओस

विदर्भ वतन / अर्जुनी मोरगाव : अनेक वर्षापासून आपल्या विविध मागण्या शासनापुढे ठेवून वेळोवेळी निवेदन, मोर्चे, धरणे या आंदोलनांच्या माध्यमातून शासनाकडे न्याय मागण्या करणारे कंत्राटी आरोग्य कर्मचारी ११ जून पासून संपावर असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेत तसे निवेदन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ‘शासन सेवेत घेण्यात यावे,रिक्त जागी समकक्ष पदावर समायोजन करण्यात यावे, समान काम समान वेतन देण्यात यावे. या मागण्यांना घेऊन शासनासोबत वाटाघाटी करण्याचे काम मंत्रालय स्तरावर सुरू आहेत मात्र, यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा या आंदोलनाने अधिकच ढासळली आहे. रिक्त जागांचा भरणा असल्याने आरोग्य व्यवस्थेचा सर्वाधिक भार हा कंत्राटी कर्मचार्यांवर आहे, जिल्ह्याची कोलमडलेली परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांवर दबाव आणून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते मात्र, या आदेशाला कंत्राटी कर्मचार्यांनी कुठलीही भीक घातली नाही. उलट त्यांचे ११ जून पासून सुरू झालेल आंदोलन आज ११ दिवसांनंतरही अविरतपणे सुरु आहे. कंत्राटी कर्मचारी हा ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे कंत्राटी कर्मचार्यांच्या भरवशावर अनेक रुग्णालय चालत असतात आज जिल्ह्यात अनेक रुग्णालय ओस पडले असून रुग्णांना उपचाराअभावी खाजगी रुग्णालयात जावं लागतं आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन गावातील मिळणारी आरोग्य व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या अनेक वषार्पासून कंत्राटी पद्धतीने अल्प व तुटपुंज्या मानधनामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत सामावून घ्या, समान काम समान वेतन लागू करा समकक्ष पदावर समायोजन करा याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मात्र प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राबूनही न्याय मिळत नसल्याने अखेर या कर्मचार्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे ठरवले. सुरुवातीलाच सौम्य असणारे हे आंदोलन आता अधिकच आक्रमक झाले आहे. जोपर्यंत न्याय मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही ही अशी भूमिका या कर्मचार्यांनी घेतली आहे. उपविभागीय अधिकारी, खंड विकास अधिकारी, तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. झामेश गायकवाड, रेखा पुराम हिना वावरे, शेंडे, मोहनकर यांचेसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.