Home Breaking News ठाणेदारासह उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

ठाणेदारासह उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

0
ठाणेदारासह उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

पोलिस हवालदाराकडून स्विकारली ३५ हजारांची लाच

राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
विदर्भ वतन /गोंदिया: नोकरीत त्रास होवू नये म्हणून चाईल्ड क्रुअ‍ॅल्टी गुन्ह्यातून सुटका करण्याकरिता पोलिस हवालदाराकडून ३५ हजारांची लाच मागून ती पोलिस उपनिरीक्षकाच्या सहाय्याने स्वीकारणार्या गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ठाणेदाराला शुक्रवार दिनांक १९ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्या ठाणेदाराचे नाव प्रदीप अतुलकर (वय ४०) आणि पोलिस उपनिरीक्षक उमेश ज्योतिराम गुटाळ (वय ३१) असे आहे.
गोंदिया पोलिस दलातील पोलिस हवालदाराविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात चाईल्ड क्रुअ‍ॅल्टी कायद्यान्वये ३० मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. हा गुन्हा अदखलपात्र होता. या गुन्ह्यातील आरोपी पोलिस हवालदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप अतुलकर यांनी तक्रारदार पोलिस हवालदाराला पोलिस ठाण्यात बोलावले. दरम्यान त्याला गुन्हा दाखल झाल्यास पुढे नोकरीत अडचण निर्माण होईल. अर्जदाराशी समझोता करण्याकरिता ३५ हजार रुपये लागतील व ते पोलिस उपनिरीक्षक उमेश गुटाळ यांच्याकडे द्या असे सांगीतले. मात्र तक्रारदार पोलिस हवालदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १८ जून रोजी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांनी सापळा रचला. १९ जून रोजी पोलिस उपनिरीक्षक उमेश गुटाळ यांनी पोलिस हवालदाराकडून ठाणेदार प्रदीप अतुलकर यांच्या करिता ३५ हजार रुपयेची लाच स्वीकारल्याने दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली.
या प्रकरणामुळे आणखी एकदा पोलिस विभागात भ्रष्टाचार किती बोकाळला आहे हे ऐरणीवर आले आहे. सतत अशा प्रकारचे ‘सेटींगचे’ प्रकार या पोलिस ठाण्यात होतच असतात, परंतु तक्रारदार पुढे येत नसल्यामुळे अशा भ्रष्ट पोलिसांचे फावते आहे. या ठाण्यातील पोलिसांनी अशाच प्रकारे प्रचंड माया जमविली असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here