
नोकरीवरून काढण्याची दिली जाते धमकी. कर्मचारी दहशतीत
विदर्भ वतन / नागपूर : सध्या कोविड-१९ च्या प्रकोपाने सर्वजन आपआपल्या जीवाच्या सुरक्षेची काटेकोरपणे काळजी घेत आहेत. शहराचा विचार केल्यास शासकीय मेडिकलमध्ये ट्रामा केयर सेंटर आणि मेडिकलमधील वार्ड नं. ४९ मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना उपचारासाठी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आधीच सर्वत्र नोकर भरती बंद आहे, अशात सर्व प्रकारच्या आजाराच्या रूग्णांचे ठाण मेडिकलमध्येच असते. त्यामुळे तेथील स्वच्छता हा सर्वात महत्वाचा आणि अग्रक्रमाचा मुद्दा ठरतो. येथे सफाई कर्मचार्यांची संख्या पुरेशी नसल्याने लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार नविन सफाई कर्मचारी भरतीची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली होती पण,निवड झालेल्या अर्ध्याच कर्मचार्यांना कोविड पसरण्यापुर्वी कामावर घेण्यात आले आणि अर्ध्या कर्मचार्यांना वेगवेगळी कारणे सांगून अडवून ठेवण्यात आले. परिणामी सध्या कार्यरत सफाई कर्मचार्यांपैकी अर्ध्या कर्मचार्यांची ड्युटी कोविड संदर्भात सुरू करण्यात आलेल्या कामांसाठी लावण्यात आली आणि उर्वरितांची मेडिकलमधील स्वच्छतेसाठी. असे असताना बाहेरून मागविण्यात आलेल्या औषधांचे मोठमोठे बक्से सफाई कामात व्यस्त असलेल्या कामगारांना बोलावून स्टोअर रूमपर्यंत नेवून ठेवण्याचे काम देखील करवून घेण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तसे पाहता गाडीमधून बाहेरून आलेल्या बक्स्यांना आत ठेवण्याचे काम गाडीसोबत आलेल्या हमालाचे असते पण एवढे सुध्दा व्यावहारीक ज्ञान मेडिकल प्रशासनाला नसावे हे नवलच. या प्रकारामुळे सफाई कर्मचार्यामध्ये मेडिकलच्या ढिसाळ प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे.
येथील सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्यासाठी मेडिकल प्रशासनाला नव्याने कोणाची परवाणगी घेण्याची गरज नाही. कारण लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार ही प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. पण मेडिकलतर्फे परिक्षा देवून उत्तीर्ण झालेल्या अर्ध्या कर्मचार्यांना क्षुल्लक कारणांवरून किंवा कोणतेही कारण नसताना अडकवून ठेवण्यात आले आहे. मेडिकलची पाहणी करण्यासाठी वेळप्रसंगी वरीष्ठ पातळीवरील पथके येतच असतात. ही पथके आली की मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडून बाहेर या सफाई कामगारांच्या नियुक्तींची यादी लावली जाते आणि पथक जाताच ही यादी पुन्हा काढून ठेवली जाते हा धुळफेक करणारा प्रकार अनेक दिवसांपासून आजही कायम आहे. अशा प्रकारे मेडिकल प्रशासनाची पाहणी करण्यासाठी येणार्या पथकाची दिशाभूल करण्याचे प्रकार आता अधिष्ठाता महोदयांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, ज्या सफाई कर्मचार्यांना नियुक्त करायचे आहे त्या कर्मचार्यांची यादी मेडिकल प्रशासनाकडे तयार आहे आणि त्याच आधारावर हा देखावा वारंवार केला जातो.
उद्भवलेल्या कोविड-१९ मुळे सफाई कर्मचार्यांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थीतीत तयार असलेल्या या कर्मचार्यांना बोलावून घेणे अगत्याचे आणि प्राधान्यक्रमाचे ठरते. पण छळ करण्याची प्रवृत्ती बोकाळलेल्या मेडिकल प्रशासनाला जाग येण्याची आणि माणूसकी दाखविण्याची बुध्दी सुचेल तेव्हा ना? शिवाय या नियुक्त्यांचे सर्व अधिकार अधिष्ठात्यांनाच आहे. तरी सुध्दा कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर कामाचा ओझा सारखा वाढविला जातो. हे कर्मचारी आपआपल्या ठिकाणी सफाईच्या कामात व्यस्त असताना मेडिकल प्रशासनाचे चतुर मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे हे स्वच्छता निरिक्षक अमोल चवरे यांना फोन करतात आणि बसल्या जागेहून स्वच्छता कर्मचार्यांना इतर कामांकडे वळविण्याचे फर्माण सोडतात. या कर्मचार्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामे करण्यास नकार दिलाच तर नोकरीवरून काढण्याची, पगार थांबविण्याची धमकी दिली जाते. बक्से उचलण्यापासून तर अटेंडन्सची कामे, परिसरातील झाडे-गवत-कचरा कापण्याची कामे, हमालीची कामे या सफाई कर्मचार्यांकडून करवून घेतली जात असल्याचे वास्तव आहे. नोकरीवरून काढून टाकण्याच्या भितीमुळे मन मारून हे कर्मचारी सांगण्यात येतील ती कामे करतात आणि अशा प्रकारे भेदभाव आणि दुर्व्यवहारांचे हे कर्मचारी वारंवार बळी पडत चालले आहेत.
एका सफाई कर्मचार्याला दोन-दोन वार्डाच्या सफाईची कामे दिलेली आहे. मेडिकलमध्ये उपचारासाठी रूग्ण येतात त्यांना जेथे ठेवण्यात येते तो परिसर स्वच्छ असावा यासाठी स्वच्छता कर्मचारी सारखा राबत आलेला आहे. रूग्णाच्या बेडपासून तर वार्डातील टॉयलेटपर्यंतच्या सफाईची जबाबदारी त्यांचेवर असते. त्यातच भर म्हणून खर्रे खावून भिंती रंगविणार्यांची संख्याही कमी नाही. अशा जागेवर काम करणार्या कर्मचार्यांना आरोग्याचे कोणतेही दुष्परिणाम होऊ नये यासाठी एका ठराविक कालावधीनंतर मेडिकल प्रशासनातर्फे ‘सेफ्टी इंजेक्शन’ मोफत दिले जाते पण ते इंजेक्शन बर्याच कालावधीपासून देण्यातच आले नाही. शिवाय सुरक्षेसाठी वार्डात गमबुट, मास्क, सुरक्षा किट, रेनकोट, दिले जातात ते सुध्दा वाटप न करता मेडिकल प्रशासनाने ठरविलेल्या दुकानातून खरेदी केल्याचे बील जोडून ठेवण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात या कर्मचार्यांचे आरोग्य निट राहिल यासाठी काहीच पाऊल उचलण्यात येत नाही किंवा सुरक्षेसंबंधी काहीच सामुग्री दिली जात नाही. उलट यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व सामग्री खरेदी केली असल्याचे मेडिकलच्या रेकॉर्डमध्ये दाखविले जात असल्याचे सुत्र सांगतात.

