नरेश बोपचेचे मारेकरी गवसले मात्र, आरोपी पसार

256

न्यायालयाने दिली एक दिवसाची पोलिस कोठडी

राधाकिसन चुटे / नरेंद्र कावळे 
विदर्भ वतन / गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या वळद व तिगाव येथील अवैध वाळू चोरीचा बिंग फोडणार्या पत्रकारांचा वचपा काढण्यासाठी केलेल्या हल्ल्यात पत्रकार नरेश बोपचे हा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.                                                                               आमगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वाळूची अवैध उत्खनन सुरू आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे.  काही पत्रकारांनी पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकार्यांना याविषयी माहिती दिली. यातच वळद येथील अवैध वाळू उपसामुळे वाळू चोरांवर दीड कोटींचा दंड प्रशासनाने आकारला होता, परंतु तस्करांनी वाळू चोरीचा मनसुबा सोडला नाही. उलट पुर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वाळूची चोरी वाढविली होती. या चोरीची माहिती पत्रकार लोक प्रशासनाला देतात, त्यामुळे त्यांचा वचपा काढण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वचपा काढण्याच्या हालचालींना वेग दिला.
बुधवारला दिनांक १७ जूनला सकाळी गजानन रहांगडाले रा. कालिमाटी (ता. गोरेगाव) यांनी तिगाव परिसरातून वाळूचे ट्रॅक्टर घेऊन जाताना दिसल्यास पत्रकार नरेश बोपचे यांनी पोलीस व तहसीलदारांना माहिती दिली. यात पूर्वीच वळद प्रकरणात व आता सुरू असलेल्या वाळू चोरीची माहिती प्रशासनाला नरेश बोपचेच देतो या संशयाने त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपी गजानन रहांगडाले व इतरांनी बोपचेवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते. यात प्रारंभी नरेश बोपचेला आमगाव येथे प्रथम उपचार करून पुढे उपचारासाठी गोंदिया येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी आरोपी गजानन रहांगडाले याला अटक करून त्याच्याविरुद्ध भादवी ३२४, ३९२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली. न्यायालयाने आरोपीला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. या हल्लाकांडात एक नाही तर अनेकांचा हात असल्याची माहिती सामोर आली आहे. परंतु पोलिसांचे हात  अद्यापही त्या आरोपींपर्यंत पोहचले नाही याचे नवल वाटते. जिल्ह्यात वाळू तस्करांनी दहशत निर्माण केली असून याविरुद्ध प्रशासनाने योग्य दखल घ्यावी या मागणीसाठी पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनातून अनेक संघटनांनी केली.  घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.