नाभिकांच्या प्रश्नांसबंधी ना. थोरात यांना निवेदन

305
विदर्भ वतन / नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिनांक १७ जून रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टंडळाने राज्यातील नाभिक समाजाच्या मागण्या तसेच या मागण्यांच्या पुर्ततेसाठी जाहीर करण्यात आलेले ‘जेल भरो आंदोलन’ या संदर्भात माहिती आणि निवेदन दिले. लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आपल्याला न्याय देण्यात येईल, असे लेखी आश्वासन या भेटीनंतर ना. थोरात यांनी शिष्टमंडळाला दिले.
गत अडीच महिन्यांपासून सतत वाढत असलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिकांचा सलून व्यवसाय पार बुडाला असून कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. यादरम्यान शासकीय मदत देखील मिळाली नसल्याने राज्यात काही सलुन व्यावसायीकांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. दुकाने सुरू करू देण्यात यावे आणि शासकीय मदत मिळावी यासाठी समाजातील विविध संघटनांकडून वारंवार शासनाला निवेदने देण्यात आली. पण शासनाने इतर सर्व प्रकारची दुकाने सुरू करू दिली, इथवरच नाही तर मद्य विक्रीसुध्दा आॅनलाईन पध्दतीने किंवा आॅर्डर नुसार ग्राहकांना घरपोच पुरविण्याची परवानगी दिली मात्र, नाभिक व्यावसायीकांना हेतूपुरस्सर डावलण्यात आले. त्यामुळे ‘ना व्यवसाय – ना शासकीय मदत’ या कैचीत नाभिक व्यावसायीक अजुनही अडकला आहे. परिणामी समाजात आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे.
ना. थोरात यांच्या भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घोषित केलेला जेल भरो आंदोलन मागे घ्यावा असे आवाहन महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष दत्ता अनारसे यांना केले. प्रदेश काँगेस सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे यांनी नाभिक शिष्टमंडळ आणि मंत्र्यांसोबतची बैठक घडवून आणली होती. याप्रसंगी समाजीक कार्यकर्ते किशोर पंडित यांची उपस्थिती होती.