शेतकर्यांना गावात जाऊन पिक कर्ज द्या

209

माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

विदर्भ वतन / कामठी : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता, नापिकी, लॉक डाऊन आणि आठ दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात बँका शेतकर्यांना पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, शेतकर्यांची ससेहोलपट थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि खरीप हंगामासाठी शासनाने शेतकर्यांना गावात जाऊन पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन दिले.
शिष्टमंडळात जि. प. विरोधी पक्षनेते अनिल निधान, भाजपा कामठी तालुका अध्यक्ष किशोर बेले, भाजपा किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष आशिष वंजारी, भाजपा पदाधिकारी रमेश चिकटे, विशाल चामट, निकेश कातुरे, प्रदीप सपाटे, गणेश झोड यांचा समावेश होता. पिक कर्ज माफ झालेल्या सर्वच गरजू शेतकर्यांना नाहरकत प्रमाणपत्राची अट न घालता कर्ज देण्याचे शासन व रिजर्व बँकेचे निर्देश असतांना सुध्दा नागपूर जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगाम पिक कर्ज देण्यासाठी बँका चालढकल करीत आहे, असा आरोप बावनकुळे यांनी निवेदनातून केला आहे.