
राज्यभरात सलून व्यवसाय बचाव आंदोलन यशस्वी
विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या सलून व्यावसायीकांनी वेळोवेळी शासनाकडे सलून दुकाने सुरू करू देण्याची मागणी केली. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सर्वच दुकाने सुरू करण्यात आली तरी सलुनची दुकाने सुरू करू देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही, याविरोधात नाभिक महासंघाने हातात फलक घेवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली.
हे ‘सलून व्यवसाय बचाव आंदोलन’ शनिवार दिनांक ६ रोजी ११ ते ३ या वेळेत संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय शिस्तबध्द पध्दतीने राबविण्यात आले. दरम्यान सलून व्यावसायीकांनी आपआपल्या दुकानांसमोर मागण्यांचे फलक हाती घेऊन हे आंदोलन यशस्वी केले.
सलून दुकाने सुरू करू देण्यात यावी, दुकानाचे भाडे, घर भाडे, वीज बिल माफ करण्यात यावे, दुकानदारांना दहा हजार रूपये आणि त्यातील कारागिरांना पाच हजार रूपये देण्यात यावे अशा अन्य मागण्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान शासनाने दिलेली मदत तुटपूंजी ठरली आणि बहुतांश लोकांपर्यंत मदत पोहचलीच नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणापुढे हात पसरावे हे कळत नाही. आमच्या व्यावसायासाठी कायमचे लॉकडाऊन असेल तर शासनाने आम्हाला आर्थीक पॅकेज द्यावे अशा आशयाचे निवेदन यापूर्वी आणि वेळोवेळी जिल्ह्याधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले पण शासनाला जाग आली नाही. तसेच आमच्या कडून महसूल हवा असेल तर आम्हा दारू विक्रीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सुध्दा एका तालुक्यातील नाभिक व्यावसायीकांनी केली होती. मात्र, झोपल्याचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आली नाही. त्यामुळे आतापर्यंत निवेदनातून मागणी केल्यानंतर निर्णय घेता न आलेल्या शासनापुढे तोंडावर मास्क आणि हातात फलक घेऊन निदर्शने करण्यात आली.
…………………………………………………………….
प्रतिक्रिया…..
……………
वर्धा जिल्ह्यात १०० टक्के आमचे आंदोलन यशस्वी झाले. शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावा-खेड्यातील सलून दुकानदारांनी आपल्या कुटुंबासह आंदोलनात उडी घेतली. इतर दुकाने सुरू करू द्यायची आणि सलून दुकानांबाबत काहीच निर्णय घ्यायचा नाही हा एक प्रकारे शासनाने केलेला आमच्यावरील अन्याय असून एक प्रकारे दडपशाही असल्याचे दिसून येते.
लिलाधर येऊलकर,अध्यक्ष
वर्धा जिल्हा सलून असो.
………………..
आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी आधी आम्ही या आंदोलनाच्या रूपरेषेची एक व्हाट्अॅपवर क्लिप पाठविली. आंदोलनासाठी आधीच जिल्हाधीकार्यांची परवानगी घेण्यात आली होती. त्यानुसार इतर जिल्ह्यात दिनांक ६ रोजी ११ ते २ या वेळेत आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. योग्य नियोजनामुळे आमचे आंदोलन पुर्णपणे यशस्वी झाले.
सतिश तलवारकर
जिल्हाध्यक्ष, नागपूर
महाराष्ट्र नाभिक महामंडळ.
……………. ….
अनेकदा निवेदन देऊन शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी दुकाने जरी सुरू करू दिली तरी आम्ही दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करून आपल्या उदरनिर्वाहापुरती कमाई करू. अशा परिस्थितीत आंदोलन करण्याची वेळ शासनाने आम्हावर येऊ द्यायला नको होती.
सुरेंद्र गणोरकर
संचालक, न्यु क्लासीक द सलून
जयप्रकाश नगर सोमलवाडा.
…………………..
अन्याय होत असेल तर आम्हाला आपला आवाज राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय राज्य घटनेने आंदोलनाचा मार्ग मोकळा करू दिला आहे. त्यानुसारच परवानगी घेवून राज्यभरात रितसर आंदोलन करण्यात आले. आता तरी आम्ही पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी आमच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे.
डॉ. सतीष फोपसे

