पत्रकार सतीश पारधी व त्यांच्या मुलाच्या घरावर मध्यरात्रीच पोहोचले पोलिस

271
   राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी 
विदर्भ वतन / गोंदिया :  येथील विविध युटूब चॅनलकरीता वार्तांकन करणारे पत्रकार व छायाचित्रकार सतिश पारधी यांच्या घरासह मुलाच्या घरावर रात्री १२ च्या सुमारास पोलिसांचे एक पथक दाखल झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडालीे. पत्रकार सतिश पारधी यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह गृहमंत्री व मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवित कुठलाही तपास आदेश नसतांना रात्रीबेरात्री आपल्या कृष्णपुरा वार्डातील घरावर व मुलगा ज्याठिकाणी भाड्याने वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जाऊन मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.
एकीकडे कोरोना पार्श्वभूमिवर संचारबंदी सुरु असल्याने कुणीही कुठे जाऊ शकत नाही, मात्र पोलीस या गोष्टीचा गैरफायदा घेत दहशत निर्माण करत आहेत. घरी येवून जोरजोराने आवाज देने व दार ठोठावणे हा लज्जास्पद प्रकार आहे. जोरजोराने दार ठोठावल्याने झोपेत असलेल्या आपल्या सुनेने व मुलगा सन्नीने दार उघडून पोलिसांना या प्रकाराबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांच्यासोबत एकही महिला पोलीस नव्हती त्यातच वरच्या रुममधून खाली येत असताना आपला मुलगा सचिन पोलीसांच्या या गैरप्रवृत्तीमुळे पायार्यांवरून वरुन खाली पडल्याने त्याच्या पायाला व डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर सतिश पारधी यांच्या सुनेने रात्रीच्यावेळी घरी येऊन दंडूकशाही पध्दतीने व्यवहार केल्याबद्दल या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
    यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रमोद घोंगे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की, देवरी पोलिसांना सन्नी पारधीच्या एका प्रकरणात तपास करावयाचा असल्याने तेथील अधिकारी व पोलीस आलेले होते. त्यांच्यासोबत फक्त आपला स्थानिक क्षेत्रातील व्यक्ती असल्यामुळे पोलीस कर्मचारी गेलेला होता.