छत्रपती शिवाजी महाराज हे खरे ‘चक्रवर्ती सम्राट’ : उदय माहुरकर

162
विदर्भ वतन / नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची व्याप्ती इतिहासकार लक्षात घेत नाहीत. महाराजांचे स्वराज्य तब्बल १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या भूप्रदेशावर होते. त्यांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्य अवघ्या ४० वर्षांत दिल्लीचे कर्ता-धर्ता बनले. त्या तुलनेत अफगाणिस्तानातून दिल्लीत येऊन राज्य करणार्या मोगलांचे राज्य कितीसे होते? तरी मोगलांना सम्राट, बादशहा म्हटले जाते, तर शिवछत्रपतींना महाराष्ट्रापुरते मर्यादित केले जाते, हे दुर्दैवी आहे. असे प्रतिपादन माहुरकर राजघराण्याचे वंशज तथा इतिहास अभ्यासक व लेखक उदय माहुरकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ जूनला तिथीनुसार झालेल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने आयोजित ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर आॅनलाईन संवादात ते बोलत होते. या संवादामध्ये प्रसिद्ध लेखक व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ‘हिंदवी स्वराज्य’ या विषयावर, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र या विषयावर मार्गदर्शन केले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केला. सुमीत सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली.