खरीप हंगाम तोंडावर, शेतकरी सावकाराच्या दारावर

242
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी मोर : धानाचे  कोठार म्हणून  प्रसिद्ध असलेल्या गोंदिया, भंडारा,  गडचिरोली  आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर  धानाचे पीक घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यात  इटियाडोह  धरण असल्याने खरीप प्रमाणेच उन्हाळ्यात सुद्धा रब्बी हंगाम म्हणून धान पिक घेतले जाते यावर्षी इटिया डोह धरणाखाली असलेल्या शेतीला सिंचनाची सोय असल्याने रब्बी हंगामात धान पीक घेतले गेले व उत्पादनसुद्धा चांगले आले.  ७ जूनला रोहिणी नक्षत्र संपणार असून मृग नक्षत्र सुरू होणार आहे. तसे म्हटले तर शेतकर्याला मृग नक्षत्र म्हणजे अल्हाददायक मात्र, पैसा हातात नसल्याने तोंडावर असलेला खरीप हंगामाचे नियोजन करायचे कसे? या चिंतेने शेतकर्याला ग्रासले आहे.
गेल्या खरीप हंगामाचे पिक शेतकर्यांनी मोठ्या आशेने बोनस मिळेल म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला विकले. शासनाने मोठा गाजावाजा करून पाचशे रुपये बोनस व दोनशे रुपये प्रोत्साहन भत्ता असे एकूण सातशे रुपये देऊ, अशी घोषणा केली मात्र, नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये विकलेल्या धानाचे अजून पर्यंत बोनस मिळाले नाही. खरीप हंगामात विकलेल्या धानाचे आधारभूत हमीभाव १ हजार ९१५ रुपये प्रतिक्विंटल शेतकर्यांच्या पदरात पडले. बोनस म्हणून मिळणारा प्रति क्विंटल ७०० रुपयांचा लाभ अजून पर्यंत मिळाला नाही. त्यामुळे समोरील खरीप हंगामाचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न शेतकर्यांच्या समोर आवासून उभा आहे.
तसेच रब्बी हंगामात निघालेले धान पिक शेतकर्यांनी सरकारी यंत्रणा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांना आधारभूत हमीभाव १८१५ रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे विकला. मात्र सव्वा महिन्याचा दीर्घ कालावधी लोटून सुद्धा अजून पर्यंत एका ही शेतकर्याला पैसे मिळाले नाही. त्यामुळे बळीराजाला समोरील खरीप हंगामाचे नियोजन कसे करायचे ही चिंता सतावत आहे. खरीप हंगामाचा बोनस व रब्बीचे प्रति क्विंटल पैसे न मिळाल्याने खरीप हंगामासाठी शेतीची मशागत, खते, कीटकनाशक, धान बिजाई, ट्रॅक्टर खर्च कसा करायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे.
गेल्या खरीप हंगामाचे धान पिक जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला विकून आतापर्यंत सहा महिन्याचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही शासनाने बोनस प्रोत्साहनपर असे एकूण प्रति क्विंटल ७०० रुपये आमच्या खात्यात जमा केले नाही. रब्बी हंगामाचे धान मे महिन्यात ‘जिल्हा मार्केटिंग फेडरेशन’ शासकीय आधारभूत हमीभाव प्रति क्विंटल १८१५ रुपये प्रमाणे विकले. त्याचे सुध्दा अजून पर्यंत पैसे मिळाले नसल्याने तोंडावर असलेल्या खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे? शासनाने आमच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करावी अन्यथा आम्हाला सावकाराच्या दारात उभे राहावे लागेल.
इस्तारी रोकडे 
धान उत्पादक शेतकरी, इसापूर.