Home गोंदिया आज ४ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आतापर्यंत ३२ रुग्ण

आज ४ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आतापर्यंत ३२ रुग्ण

111 views
0
राधाकृष्ण चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन / गोंदिया : शहरातील गणेशनगर परिसरातील एका तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचाराअंती त्याचा नमुना निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झालेला आहे. शुक्रवारला (दि. २२) परत जिल्ह्यात ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर २१ मे रोजी २६ आणि १९ मे रोजी २  रुग्ण आढळून आले होते.  आता ३२ रुग्ण जिल्ह्यात पॉझिटिव्ह असून एक रुग्ण यापुर्वी निगेटिव्ह झालेला आहे. २१ मे रोजी जिल्ह्यात एकासोबत २६ नवे रुग्ण आढळल्याबरोबर जिल्हा रेडझोनमध्ये गेलेला आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे मुंबई, पुणे येथून आलेले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात गोरेगावातील २, सालेकसा एक व  अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक रुग्णांचा समावेश आहे. गोरेगाव तालुक्यातील संबधित गणखैरा गाव हे कंटेनमेंट मध्ये आले असून गोरेगाव तहसिलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला भेट देत सर्व पाहणी केली आहे. सोबतच रस्ते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातून आतापर्यंत ५१८ लोकांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी ४५१ अहवाल प्राप्त झाले असून ६७ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह होता. अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्यात रुग्ण आढळल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगपार दल्ली, पांढरवाणी, डोंगरगाव, केसवलेवाडा, तिडका, कोदामेडी, सडक अर्जुनी, सावंगी, बाम्हणी, कोहमारा, सालईटोला, कन्हारपायली व उशीखेडा या गावांचा कंटेनमेंट झोन म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. तसेच बफर झोनमध्ये सुध्दा काही गावांचा समावेश अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.
गोंदिया जिल्हा करोना रिपोर्ट – अर्जुनी मोरगाव २३, सडक अर्जुनी ०५,गोरेगाव ०२, सालेकसा ०१, आमगाव ०१ असे एकूण ३२ रूग्ण आहेत.